…तर बसप सरकारमध्ये सहभागी होणार : मायावती

विश्रांतवाडी – राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी रविवारी वडगाव शेरीचे उमेदवार डॉ. हुलगेश चलवादी यांच्यासह राज्यातील बसप उमेदवाराच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेतली.
सभेदरम्यान त्यांनी बसप सत्तेत सहभागी होईल, असे भाष्य केले. योग्य संख्याबळ आले नाही, तर “बॅलेसिंग पॉवर’ म्हणून सरकार बनवणाऱ्या पक्षाला समर्थन देवून आणि सरकारमध्ये सहभागी होऊन लोकांना न्याय देऊ, असे आश्वासन यावेळी मायावतींनी दिले.
मतं ट्रान्सफर होत नसल्यामुळे इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक लढवण्यावर विश्वास नसल्याचे मायावती म्हणाल्या. यापूर्वी जेव्हाजेव्हा इतर पक्षांसोबत मिळून बसपने निवडणूक लढवली, तेव्हा दलितांचे मत सोबत असलेल्या पक्षाच्या उमेदवाराला गेली. परंतु जातीवादी मानसिकतेमुळे त्यांच्या पक्षाचे बहुतांश मत आमच्या पक्षाला मिळत नाही. त्यांची मत अंतर्गतरित्या दुसऱ्या उमेदवाराला जातात.
अनेक जागांवर बसपचे उमेदवार त्यामुळे निवडून येत नाही. पक्षाच्या मतांची टक्केवारी देखील कमी होते. म्हणून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे मायावती म्हणाल्या. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन आरक्षण व्यवस्था संपुष्टात आणण्याचे भाष्य केले होते. गांधींच्या वक्तव्याचा देखील मायावतींनी टीका केली. राहुल गांधी यांचे वक्तव्य चिंताजनक असून कॉंग्रेसची मानसिकता दाखवणारी असल्याचे मायावती म्हणाल्या.
वडगावशेरी मतदारसंघातील उमेदवार डाॅ. हुलगेश चलवादी यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद, राज्यसभा खासदार आणि केंद्रीय समन्वयक रामजी गौतम, केंद्रीय समन्वयक तथा महाराष्ट्र प्रभारी नर्मदाप्रसाद अहिरवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅड.सुनील डोंगरे, प्रदेश महासचिव काळुराम चौधरी, प्रदेश सचिव सुदीप गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप कुसाळे व पुणे जिल्हा प्रभारी मोहंमद शफी प्रामुख्याने उपस्थित होते.





