पिंपरी – शहरात मान्सून दाखल होण्यापूर्वी 15 मेनंतर रस्ते खोदाई बंद करून रस्ते दुरुस्ती केले जातात. पावसाळ्यात रस्ते खोदाईमुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था होऊन अपघातांचा धोका असतो. महापालिकेने 15 मेपासून शहरात कोणत्याही प्रकारे रस्ते खोदाई करू नये, असे आदेश दिले आहे. त्यामुळे महापालिकेचे आदेश डावलून रस्ते खोदाई करणाऱ्यांवर यापुढील काळात खोदाई धोरणानुसार कारवाई होणे अपेक्षित आहे.
सार्वजनिक आणि खासगी अशा सेवा-सुविधांच्या निर्मितीसाठी शहरात सातत्याने रस्ते खोदाई केली जाते. त्यासाठी खोदाई शुल्क भरून महापालिकेची परवानगी घेणे गरजेचे आहे. तर पावसाळ्यात रस्ते खोदाई पूर्णपणे बंद ठेवणे अपेक्षित असते. मात्र, मागील काही वर्षात आवश्यक कामांच्या नावाखाली पालिका कंत्राटदार व इतर खासगी संस्थांकडून पावसाळ्यातही खोदाई सुरू होती. त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था होऊन अपघातांना निमंत्रण मिळते. दरम्यान, यावर्षी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी 15 मे ते 15 ऑक्टोबर या पावसाळ्यातील कालावधीत रस्ते खोदाई बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत.
त्यानुसार शहरात 15 मेपासून रस्ते खोदाई बंद करण्यात आल्याचा दावा महापालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. या कालावधीत रस्ते खोदाई बंद ठेवण्यात यावी. खोदलेले रस्ते पूर्ववत करावेत. अपवादात्मक परिस्थितीत रस्ते खोदाई करण्याची आवश्यकता असल्यास त्यांनी महापालिकेची मान्यता घेण्यात यावी. हे प्रस्ताव शहर अभियंता यांची पूर्वमान्यता घेऊन आयुक्त यांच्याकडे सादर करावेत, असे आदेशात म्हटले आहे.
महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार सर्व यंत्रणांना 15 मे ते 15 ऑक्टोबर 2023 या कालावधीत रस्ते खोदाई बंद ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत. सद्यस्थितीत खासगी संस्थेला रस्ते खोदाईस परवानगी दिलेली नाही.
– ज्ञानदेव जुंधारे, सहशहर अभियंता