“वॅक्‍स म्युझियम’मध्ये चोरी करणारे अटकेत

राजस्थानमध्ये कारवाई : रोकडसह एलईडी टीव्ही, संगणक जप्त

लोणावळा – पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील सुनील वॅक्‍स म्युझियमच्या गल्ल्यातील दोन लाखांच्या रोकडसह एक एलईडी टीव्ही तसेच दोन कॉम्प्युटर मॉनिटरची चोरी करून राजस्थानमध्ये पोबारा करणाऱ्या तीन परप्रांतीय चोरट्यांना अवघ्या दोन दिवसांत राज्यस्थानमध्ये जाऊन गजाआड करण्यात लोणावळा शहर पोलिसांना यश आले आहे. या चोरीची घटना 27 मार्चच्या पहाटे घडली होती.

मोतीराम छत्राराम ओटावत (वय 21), हरिराम मोतीराम चौहान (वय 21), शंकर चौहान (वय 23, तिघेही रा. धानवर्ली, ता. बाली, जि. पाली, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या पैकी दोन चोरटे हे सुनील वॅक्‍स म्युझियम या ठिकाणी असलेल्या कॉफी शॉपमध्ये कामाला होते. यामुळे त्यांना येथील चांगली माहिती होती. या माहितीचा आधारे संबंधितांनी आपल्या अन्य एका साथीदाराच्या मदतीने 27 मार्चच्या दिवशी पहाटे स्वतःचे चेहरे लपवत म्युझियमच्या दरवाजावरील ग्रीलच्या फटीमधून आत प्रवेश केला. तेथील गल्ल्यातील दोन लाखांच्या रोख रक्कमेसह 20 हजार रुपये किंमतीचा एलईडी टीव्ही, 15 हजार रुपये किंमतीचा कॉम्प्युटर मॉनिटर आणि 10 हजार रुपये किंमतीचा आणखी एक मॉनिटर असा एकूण दोन लाख, 45 हजार रुपयांचा मुद्देमाल माल चोरून नेला होता.

याबाबत वॅक्‍स म्युझियमचे व्यवस्थापक अनिलकुमार तामराशन (वय 43) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत बातमीदार व अन्य मार्गानी मिळालेल्या माहितीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, हवालदार प्रकाश सामील, पोलीस नाईक वैभव सुरवसे, राम जगताप व पोलीस शिपाई जयराज देवकर यांच्या पथकाने तिन्ही आरोपींना राजस्थान येथे ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख एक लाख 42 हजार रुपयांसह 15 हजार रुपये किंमतीचा संगणक असा एकूण एक लाख 57 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा पोलीस करीत आहेत.
लोणावळा पोलिसांनी दोन दिवसांत आरोपींना अटक केल्याबद्दल त्यांचे लोणावळा शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.