Alandi: आळंदी (ता. खेड, जि. पुणे) येथील संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरल्याप्रकरणी मंदिरातील एका सेवकाविरोधात आळंदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल वारुळे (वय ३३) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर महादेव वीर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वारुळे हा मंदिरात सेवक म्हणून कार्यरत होता. दानपेटीतील रक्कम काढून ती कॅशियर रूममध्ये जमा करण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपविण्यात आली होती. 15 हजार रुपयांची रक्कम चोरली – तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १२, १३ आणि १६ मे २०२६ रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत आरोपीने दानपेटीतील रक्कम काढताना नजर चुकवून काही पैसे पोत्यात भरले. त्यानंतर हे पोते बादलीत ठेवून त्यावर ट्रे ठेवण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. कॅशियर रूममध्ये पोहोचल्यानंतर आरोपी पैसे कपाटामागे लपवून त्यावर फुलांचे हार ठेवत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, कॅशियर महेश गोपाळ गोखले यांना “हार घेऊन जात आहे,” असा भास निर्माण करून आरोपीने तीन दिवसांत प्रत्येकी सुमारे पाच हजार रुपये, अशी एकूण १५ हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आळंदी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक खडके या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमा नरके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.