मराठा आरक्षणासाठी संपवली जीवनयात्रा! आत्महत्येपूर्वी “फेसबुक लाईव्ह’मध्ये प्रसाद देठे काय म्हणाले ?

वाघोली – मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला असतानाच वाघोली जवळ कटकेवाडी परिसरामध्ये मराठा आंदोलक प्रसाद देठे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१९) सकाळी घडली आहे. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुक लाईव्ह तसेच सुसाईड नोट लिहिली आहे. फेसबुक लाईव्हद्वारे मराठा आरक्षणाचा मुद्दा पोटतिडकीने मांडला असून सुसाईड नोट मध्ये ओबीसी नेत्यांना मराठा आरक्षण मिळू द्या, अशी विनंती व जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका, अशी विनंती केली आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंदोलनाला सुरूवात केली. तर मराठ्यांना ओबीसीतुन आरक्षण मिळवून देण्याच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे आरक्षणाचा मुद्दा पेटला असतानाच मराठा आरक्षणासाठी प्रसाद देठे या तरुणाने आत्महत्या केली आहे. देठे मुळचे बार्शी येथील असून नोकरी निमित्त अनेक वर्षांपासून वाघोली परिसरामध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. तिन्ही मुले वाघोलीत शिक्षण घेत आहेत.
प्रसाद देठे हे तुळापुर येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाच्या विकासासाठी प्रत्नाशील होते व सोशल मीडियावर सक्रिय होते. ते सतत सोशल मीडियावर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ पोस्ट टाकत होते. त्यांनी अनेकदा फेसबुक लाईव्ह करून मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली होती. आत्महत्या करण्यापूर्वी देखील त्यांनी जरांगे-पाटील जिंदाबाद, लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, आणि मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील,” असे फेसबुक पोस्टमध्ये म्हंटले होते.
अनुचित प्रकार घडू नये म्हणून लोणीकंद पोलिसांची याची दखल घेत वाघोली लोणीकंद व त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात मोठा बंदोबस्त लावला आहे. घरातील करता पुरुष गेल्याने घरावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाने कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत घ्यावे व त्यांच्या मुलांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि तात्काळ आर्थिक मदत शासनाने करावी अशा मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाने केली असून त्याबाबत निवेदन महसूलचे मंडलाधिकारी संदीप झिंगाडे लोणीकंद व लोणीकंद चे पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांना देण्यात आले.
दरम्यान प्रसाद देठे यांच्या आत्महत्येच्या घटनेने मराठा समाजामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याचीही शक्यता आहे.
सुसाईड नोटमध्ये काय म्हंटले ?
“जयोस्तु मराठा…मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजा ताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, T.P मुढे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळून द्या विनंती आहे तुम्हाला.
हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आलं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्व:खुशीने मरत आहे. जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका, विनंती आहे तुम्हाला.
माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर, लेकरांची काळजी घे. धीट रहा. मला माफ करा.
तुमचाच प्रसाद”
प्रसाद देठे फेसबुक लाईव्हमध्ये काय म्हणाले?
जरांगे पाटील यांचा एक आदेश आला की लाखोच्या लाखो लोक रस्त्यावर उतरतील, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, आत्महत्या न करता समोरच्याला मारण्याच्या इराद्याने उतरतील, मग तुम्हीच बघा आता काय करायचं आहे.
कारण आज लक्ष्मण हाके पुन्हा उपोषणाला बसले आहेत. जरांगे आतापर्यंत चारवेळा उपोषणाला बसले आहेत, पण त्या तिकडे कधी अंतरावली सराटीला गेल्या नाहीत. पण लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी वडिगोद्रीला दोघे जण बहिण भाऊ जाऊन आलेले आहेत. आणि पंकजा ताईंच्या दोन तीन कार्यकर्त्यांनी आत्महत्या केलेल्या, त्यामुळे त्या त्यांच्या घरी सांत्वन करायला गेल्या.
मराठा समाजाच्या युवकांच्या देखील इतक्या आत्महत्या झालेल्या आहेत. उद्या जर मी मेलो तर पंकजा ताई माझ्या घरी येणार आहेत का? मला पण तीन लेकरं आहेत, त्या लेकरांचं काय होईल, कसं होईल? उद्या पंकजा ताई माझ्या घराच्यांच्या अश्रू पुसायला येणार आहेत का? पंकजा ताई, लक्ष्मण हाके, बबनराव तायवाडे आणि प्रकाश शेंडगे यांना जसं त्यांच्या समाजात दिसतयं. तसं त्यांनी इतर समाजाच्या युवकांचे प्रश्न त्यांनी बघावेत.
प्रसाद देठेच्या फेसबूकला सगळं दिसतंय. ही माझी कंपनी हे माझे विश्व. नाईटला इथे काम करतोय, दिवसाही कुठेतरी काम करावं लागतं. २४ तास काम करून सुद्धा लेकरांच भागत नाही. ही माझीच नाही सगळ्यांचीच व्यथा आहे. त्यामुळे विरोध करणाऱ्यांनी सुद्धा थोडासा अभ्सास करावा. इतर वाड्या वस्त्यांमध्ये न फिरता बाकीच्या ठिकाणी सुद्धा फिरावं. मराठा समाजाच्या युवकांच्या अडीअडचणी समजून घ्यावात, अशी विनंती देठे यांनी यावेळी केली होती.






