Satara | शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी देण्याचे काम अंतिम टप्प्यात

गोंदवले, (वार्ताहर) – शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी देणाऱ्या पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्याचा आले असल्याची माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.
जिहे कटापूर योजनेच्या ३२ गावांना पाणी देणाऱ्या पाईपलाईनच्या धूळदेव, हिंगणी, मासाळवाडी, पर्यंती, शेवरी आणि आंधळी पंप हाऊस येथील कामाची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आ.गोरे म्हणाले, जिहे कटापूर योजनेच्या २०१९च्या सुधारित सुप्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या योजनेचा खर्च हा ३२ कोटी रुपयांचा होता. मात्र तेवढा निधी पुरेसा नसल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने या योजनेला भरीव निधी मिळवण्यात आम्हाला यश आले आहे.
या योजनेच्या पाईपलाईनचे काम अधिकाऱ्यांच्या मेहनतीमुळे अंतिम टप्प्यात आहे. जिहे कटापूर योजनेचे पाणी आंधळी धरणात येऊन माणगंगा नदीपात्रात राजेवाडी पर्यंत वाहत आहे.
बघून विरोधकांना सर्वात मोठे दुःख झाल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. ज्या लोकांना नदीत वाहणारे पाणी बघून आनंद झाला आहे, त्या लोकांच्या तरी आनंदात विरजण पाडू नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
विरोधकांनी कितीही देव पाण्यात ठेवले तरीही या योजनेचे काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी जाणारच आहे. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संबंधित योजनेतून आंधळी धरणात आलेले पाणी हे निसर्गाचेच आहे. याचे मी श्रेय घेत नसून हे सर्व श्रेय माण खटावच्या जनतेचे आहे.
या योजनेच्या आणि जनतेच्या कामामधील माध्यम मात्र आहे. जनतेच्या आशीर्वादाने मी आमदारकीचा फॉर्म भरणारच आहे. त्यामुळे विरोधकांनी आमदार गोरेला फॉर्म भरता येणार नाही, यासाठी केलेल्या प्रयत्नांचा काही फायदा होणार नाही असे ही ते म्हणाले.
खटाव तालुक्यातील आणि माणमधील योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावी, ही आमची मनापासून इच्छा आहे. त्यासाठी निमंत्रण देऊन त्यांना या शुभारंभासाठी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही आ. गोरे यांनी सांगितले.





