पुणे – मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गालगत असलेल्या टेकडीवर सकाळी फिरायला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत वारजे भागातील एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला गुरुवारी सकाळी बाह्यवळण मार्गावर असलेल्या वंडर फ्युचरा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या टेकडीवर फिरायला गेली होती. महिला मोबाईल संचावर गाणी ऐकत तेथून जात होते. त्यावेळी तिच्या मागावर असलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील 40 हजारांचे मंगळसूत्र तसेच हेडफोन असा ऐवज हिसकावून नेला. घाबरलेल्या महिलेने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तिने दिलेल्या वर्णनानुसार चोरट्याच माग काढण्यात येत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उर्किडे तपास करत आहेत.