पुणे – खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असता, महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात घडली. याप्रकरणी एका 30 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधाच्या संशयावरून पाच जणांनी अमर ओंबासे याच्यावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली. या प्रकरणात या महिलेला रविवारी दुपारी चौकशीसाठी बोलावले होते.
चौकशीदरम्यान ही महिला बहाणा करून पोलीस ठाण्यातील बाथरुममध्ये गेली. तेथे तिने स्वत:ला जखमी करून घेतले. बराच वेळ झाला, तरी ही महिला बाहेर का येत नाही, म्हणून महिला पोलीस कर्मचाऱ्याने दरवाजा वाजवला.
परंतु, आतून तो बंद होता. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा जबरदस्तीने उघडला. तर ही महिला रक्तबंबाळ अवस्थेत होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.