यवतमाळ – विष प्राशन केलेल्या महिलेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या महिलेचा जिवंतपणीच मृत्यू अहवाल पोलीस ठाण्यात पाठवण्यात आला. पोलीसांनीही त्या महिलेच्या मृत्यूची नोंद केली.
महिला उपचारानंतर बरी होऊन घरी गेली. मात्र दैनिकात आपल्या मृत्यूची बातमी वाचून हादरली. त्यानंतर तिने थेट पोलीस ठाणे गाठले.
मृत अशी नोंद असलेली महिला समोर उभी राहिलेली पाहून पोलीसही अवाक् झाले. त्यानंतर त्यांनी झालेली चुक मान्य करून महिलेला पुन्हा कागदोपत्री जिवंत केले. ही घटना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बुधवारी घडली.
उज्ज्वला राजेश वानखेडे (वय 25, मोठे वडगाव परिसर, शांतीनगर) या महिलेने 6 ऑक्टोबर रोजी विष प्राशन केले. त्यानंतर महिलेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. विष प्राशन केल्याचे प्रकरण पाहून मृत्यूपूर्व जबाब नोंदविण्यासाठी मेमो तयार केला आणि वाॅर्डबाॅय मार्फत पोलीस ठाण्यात पाठविला. असे वैद्यकीय प्रशासनाने म्हटले.
तर, वैद्यकीय महाविद्यालयातून मृत्यूबूर्व जबाबाच्या ऐवजी मृत्यू अहवाल (डेथ मेमो) मिळाला होता त्यामुळे महिलेची मृत्यूची नोंद करण्यात आली असे अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद वागतकर यांनी सांगितले.
सदर प्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाने आकस्मिक विभागास चौकशीचे आदेश दिले आहे. हा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे अधिष्ठाता डाॅ. मिलिंद कांबळे यांनी दिली.