नगर -जिल्ह्यात आज आठ करोनग्रस्त आजारातून बरे होऊन घरी परतले. यामध्ये, संगमनेर, श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यांतील प्रत्येकी दोन, नगर तालुका आणि जामखेड तालुक्यांतील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 273 झाली आहे. तसेच आज जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने 15 रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या 397 झाली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरात सहा, नालेगावात तीन, आडते बाजार एक, तारकपूर आणि तोफखाना परिसरात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत. यातील तारकपूर येथील रुग्ण हा भोपाळ येथून प्रवास करून आला होता. याशिवाय, श्रीगोंदा तालुका तीन, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर आणि पारनेर तालुक्यांत प्रत्येकी एक आणि राहाता तालुक्यात दोन करोनाबाधित आढळले आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील बाधित आढळलेली व्यक्ती भिवंडी येथून प्रवास करून आली होती, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. दोन दिवसांपासून नगर शहरात करोना रुग्ण वाढीचा आकडा वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यानुसार तोफखाना परिसर आणि सिद्धार्थनगर, नालेगाव भागात सर्वाधिक रुग्ण आढळ्याने महापालिकेने दोन्ही परिसर 10 जुलैपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. या दोन्ही परिसरांत कन्टेन्मेंट झोन जाहीर करून ये-जा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच आज शहरात पुन्हा पुन्हा सहा रुग्णांची त्यात भर पडली आहे. दरम्यान, जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 111 झाली असून, एकूण रुग्ण संख्या 397 इतकी झाली आहे, तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.