पुणे : बहिणीचा विवाह जुळवणाऱ्या व्यक्तीस मारहाण करुन त्याची गाडी जाळल्याची घटना हडपसर येथील नालबंद चाळीमध्ये रविवारी घडली. बहिणीला पती त्रास देत असल्याने भावाने हे कृत्य केले. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी जोजो इक्बाल खान (रा.गरुड वस्ती, हडपसर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी फरिद इब्राहिम नालबंद(50,रा.हडपसर) यांने त्याच्या चुलत भावाच्या मुलाचे लग्न आरोपीच्या बहिणीसोबत लावून दिले होते. विवाहानंतर आरोपीच्या बहिणीला पती सातत्याने त्रास देत होता. याचा राग मनात धरुन आरोपीने लग्न जुळवणाऱ्या फरिद यांच्या फ्रुटस्टॉलचे नुकसान केले. यानंरत त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. जाताना त्यांची ऍक्टीव्हा गाडी पेट्रोल टाकून जाळली. यामध्ये गाडीचे 30 हजाराचे नुकसान झाले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस फौजदार पठाण करत आहेत.