Eknath Khadse : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहेत. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकासआघाडीतील घटक पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील इन्कमिंग जोरदार वाढले आहे, तर महायुतीमधीलच घटक पक्षांतील अनेक नेते पुढील राजकीय गरज पाहता पक्ष बदलत आहेत. महाविकास आघाडीत परिस्थिती फार बरी नाही. या स्थानिक निवडणुकांचे रणांगण तापू लागले असून, जोरदार मोर्चेबांधनी सर्वच पक्षांकडून केली जात आहे. पहिल्या टप्प्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका बड्या नेत्याने मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. मुक्ताईनगरच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी निवडणूक लढण्यासारख्या जागा न मिळाल्यास आपण निवडणुकीतून माघार घेऊ असे म्हटले आहे. मुक्ताईनगरमध्ये पक्षाला जोरदार धक्के बसत असतानाच खडसेंच्या या घोषणेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे? “आपल्या पक्षाची ताकद ज्या पद्धतीने ग्रामीण भागात आहे. तशी शहरात म्हणावी तशी नाही. यामुळे येथील मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणुकीत मोजक्या चार-पाच जागांवर निवडणूक लढविण्याचा विचार आहे. ज्या आपण जिंकू. मात्र येथेही तसे चित्र नाही दिसल्यास निवडणूकही लढविणार नाही.” राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठीच्या निवडणुकीच्या आखाड्यात अनेकजण इच्छुक आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. आत्तापर्यंत अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर अर्जाच्या शेवटच्या तारखेनंतर अर्जाची छननी केली जाईल. त्यामुळे दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात कोण माघार घेणार कोणाचे अर्ज बाद होणार हे पाहावे लागणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक पातळीवर राजकीय परिस्थिती पाहून त्यानुसार आघाड्या आणि युत्या झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी प्रमुख राजकीय पक्ष स्वबळाची चाचपणी करताना दिसत आहे. शरद पवार गटासाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे. पक्षाला मोठी कसरत निवडणुकीसाठी करावी लागणार आहे. पक्षासाठी सकारात्मक गोष्ट म्हणजे भुसावळ नगरपालिका स्वबळावर लढण्याची घोषणा एकनाथ खडसे यांनी केली आहे. त्यामुळे एकीकडे मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत मोजक्या चार-पाच जागांवर निवडणूक लढविण्याचा विचार आहे. मात्र, येथेही चित्र नाही दिसल्यास निवडणूकही लढविणार नाही, असे खडसेंनी म्हटले आहे. तर दुसरीकडे भुसावळ नगरपालिकेसाठी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा एकनाथ खडसेंनी केली आहे. त्यामुळे खडसेंच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र- पवार पक्ष काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : Vadgaon Maval : राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासह १६ नगरसेवकांनी अर्ज केले दाखल