पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झाली 3.56 टक्क्यांनी वाढ

पिंपरी – पवना धरणाच्या पाणी साठ्यामध्ये गेल्या नऊ दिवसांमध्ये 3.56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या धरणात 20.99 टक्के इतका पाणीसाठा आहे.
पवना धरणातील पाणी साठ्यात वाढ होत नसल्याने पिंपरी चिंचवड शहरात आणखी पाणी कपात लागू करण्याच्या हालचाली महापालिकेच्यावतीने सुरू झाल्या आहेत. मात्र आता हळुहळु पाणी साठ्यात वाढ होऊ लागल्याने पिंपरी चिंचवडकरांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये जून महिन्यात अपेक्षित पाऊस होत नाही. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे नियोजन करताना 31 जुलै पर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन करावे लागते. यंदा 28 जून रोजी धरणात 17.43 टक्के इतका पाणीसाठा होता. तर पावसाळा सुरू झाल्यापासून 202 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तर रविवारी (7 जुलै) सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण 401 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर 6 जुलै रोजी 40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे नऊ दिवसांत पवना धरणाच्या पाणी पातळीत 3.56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या धरणात 20.99 टक्के इतका पाणीसाठा आहे.




