पुणे : प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सभागृह नेता म्हणून महापालिकेच्या निधीतून समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार पेठ परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या जाळ्याचा गुन्हेगारांवर वचक ठेवण्यास मोठा फायदा होत आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्ष ठेवण्यासाठी १७० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने प्रभागाची सुरक्षा वाढली असून, पोलिसांवरील ताण कमी झाला आहे. भविष्यात या सुविधेत, तसेच प्रभागाच्या सुरक्षेसाठी आपले सर्वोच्च प्राधान्य राहणार असल्याचे प्रभाग क्रमांक २४ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार गणेश बिडकर यांनी मतदारांशी संवाद साधताना दिली. बिडकर म्हणाले, सध्याच्या प्रभाग क्रमांक २४ मध्ये येणाऱ्या या मध्यवर्ती भागातील २४ मुख्य चौक, ६० मोक्याच्या जागा, महत्त्वाच्या शाळा, रुग्णालये, एटीएम, बस थांबे यासह गर्दीच्या ठिकाणांची निवड करण्यात आली. समर्थ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ८० टक्के भाग या कॅमेऱ्यांनी व्यापला आहे. या कॅमेऱ्यांमुळे पोलिसांना गर्दीवर लक्ष ठेवणे सोपे जात आहे. पेठांचा हा परिसर पालखी सोहळा, गणेशोत्सव, सामाजिक कार्यक्रमांच्या वेळेला प्रचंड गजबजलेला असतो. अशा वेळी या कॅमेऱ्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षितेत वाढ होऊन पोलीस यंत्रणेवरील ताण हलका होत असल्याचा दावाही त्यांनी केला. या वेळी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.