US-Iran-Israel War – देशातील खाद्यतेलाच्या आयातीने मार्च महिन्यात मोठी उसळी घेतली असून, वार्षिक स्तरावर यात १२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सी) जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात एकूण ११.७३ लाख टन खाद्यतेलाची आयात झाली आहे. प्रामुख्याने कच्च्या पाम तेलाच्या शिपमेंटमध्ये झालेल्या वाढीमुळे हा आकडा वधारला असल्याचे दिसून येते. मार्च २०२५ मध्ये हाच आकडा १०.४५ लाख टन इतका होता. cooking oil गेल्या वर्षीच्या तुलनेत कच्च्या पाम तेलाची आयात जवळपास दुप्पट झाली आहे. मार्च २०२५ मधील ३.४३ लाख टनांच्या तुलनेत गेल्या महिन्यात ६.७३ लाख टन कच्च्या पाम तेलाची आयात करण्यात आली. तथापि, मार्च २०२६ च्या एकूण आयातीचा विचार करता फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत यात १० टक्क्यांची घट झाली आहे. फेब्रुवारीमध्ये १२.९२ लाख टन तेलाची आयात झाली होती. जागतिक बाजारातील वाढते दर, रुपयाचे घसरलेले मूल्य आणि देशांतर्गत मोहरीच्या पिकाची चांगली उपलब्धता यामुळे गेल्या महिन्याच्या तुलनेत आयातीत काहीशी घट झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भारताच्या एकूण वनस्पती तेल आयातीवर नजर टाकल्यास, मार्च महिन्यात ही आयात ११ टक्क्यांनी वाढून ११.८६ लाख टनांवर पोहोचली आहे. चालू विपणन वर्षाच्या (नोव्हेंबर-ऑक्टोबर) पहिल्या पाच महिन्यांत म्हणजेच नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान एकूण आयात ८ टक्क्यांनी वाढून ६५.७२ लाख टनांवर गेली आहे. भारत प्रामुख्याने इंडोनेशिया आणि मलेशियाकडून पाम तेल, तर अर्जेंटिना आणि ब्राझीलकडून सोयाबीन तेलाची आयात करतो. देशांतर्गत गरजेच्या निम्म्याहून अधिक वाटा हा आजही आयातीवर अवलंबून आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेला संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कडाडल्या असून मालवाहतुकीचा खर्चही (फ्रेट कॉस्ट) वाढला आहे. यामुळेच डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान भारतीय आयातदारांनी मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवला होता. मात्र, आता जागतिक परिस्थिती आणि जैवइंधनासाठी तेलाचा वाढता वापर पाहता, आगामी काही महिन्यांत खाद्यतेलाची आयात काहीशी मंदावण्याची शक्यता आहे. सीच्या मते, जोपर्यंत जागतिक किमती स्थिर होत नाहीत, तोपर्यंत भारतीय रिफायनर्स वेट ॲड वॉच धोरण अवलंबण्याची चिन्हे आहेत.