आगामी वर्षाबाबत वाहन उत्पादक आशावादी
दिल्लीतील ऑटो एक्स्पोत आधुनिक वाहनांचे सादरीकरण होणार
पुणे – सरलेली दोन वर्षे वाहन उद्योगासाठी मंदीची गेली आहेत. त्याला अनेक कारणे आहेत. मात्र, भारतातील दरहजारी वाहन प्रमाण फारच कमी असल्यामुळे आगामी काळ भारतीय वाहन उद्योगासाठी आशादायक असेल, असे मोटार उत्पादकांच्या संघटनेने म्हंटले आहे.
वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या सियामचे उपसंचालक सुगातो सेन यांनी सांगितले की, नोटाबंदी, जीएसटी, उत्सर्जन नियमातील बदल या कारणामुळे गेल्या वीस वर्षात प्रथमच वाहन विक्री प्रदीर्घकाळ कमी झालेली आहे. भारतातील दरहजारी वाहनांचे प्रमाण कमी असल्यामुळे केवळ भारतातीलच नाही तर परदेशातील वाहन उद्योग भारतामध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
बहुतांश वाहन उत्पादकांनी बीएस-6 वाहन उत्सर्जन मानदंडाची वाहने निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये अशा प्रकारची बरीच वाहने भारतामध्ये सादर करण्यात आली आहेत. आगामी काळातही हे प्रमाण वाढणार आहे. अगोदरच्या वाहनांच्या तुलनेत नवी वाहने थोडी खर्चिक असली तरी आता अशाच प्रकारची वाहने बाजारात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑटो एक्स्पोची तयारी पूर्ण…
दिल्लीमध्ये 7 ते 12 फेब्रुवारी होणाऱ्या ऑटो एक्स्पोची तयारी पूर्ण झालेली आहे. त्यामध्ये सिआम संघटनेचे भारतातील सदस्य नवी 70 वाहने सादर करणार आहेत. त्याच बरोबर परदेशातील बऱ्याच कंपन्या भारतामध्ये ऑटो एक्स्पोवेळी आपल्या वाहनांचे सादरीकरण करणार आहेत. त्यामध्ये चीनमधील द ग्रेट वॉल, एमजी मोटर्स या कंपन्या भारतात आपली वाहने सादर करणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या यावेळी जास्त असण्याची शक्यता आहे. कारण भारत सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात चालना दिलेली आहे.