Vijay Sethupathi : अखेर प्रतीक्षा संपली! विजय सेतुपतीचा बहुचर्चित ट्रेन ‘या’ दिवशी होणार रिलीज
Vijay Sethupathi : निर्माते कलाइपुली एस. थानू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘ट्रेन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

Vijay Sethupathi’s upcoming movie : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय सेतुपती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी तमिळ थ्रिलर ‘ट्रेन’ चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. चाहते जवळपास तीन वर्षांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत होते. अखेर निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असून, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘ट्रेन’ कधी होणार प्रदर्शित?
निर्माते कलाइपुली एस. थानू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘ट्रेन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार, हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दीर्घकाळापासून या चित्रपटाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
या चित्रपटात विजय सेतुपतीसोबत अभिनेत्री श्रुती हासन महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. थरारक कथानक आणि दमदार कलाकारांची फळी यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाचा प्रकार थ्रिलर असला तरी कथेला भावनिक पैलूची जोड देण्यात आली आहे.
Get ready for the ride!🚂
#Train storms into cinemas worldwide on ‘DECEMBER 4’!@mysskindirector @VijaySethuOffl @shrutihaasan @nasser_kameela @ksravikumardir @ira_dayanand @itsNarain @preethy_karan @KalaiActor @ActorRohan02 #YugiSethu @fowziafathima @editorsriwat #TapasNayak #StreetLight @vijaytelevision @RIAZtheboss @parasriazahmed1 @saregamasouth @teamimpr
— Kalaippuli S Thanu (@theVcreations) October 12, 2026
काय आहे ‘ट्रेन’चं कथानक?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘ट्रेन’ची कथा अशा एका व्यक्तीभोवती फिरते, ज्याने जगण्याची इच्छा गमावलेली असते. आपल्या पत्नीच्या कबरीवर झाड लावण्याच्या उद्देशाने तो रेल्वे प्रवासाला निघतो. मात्र, या प्रवासादरम्यान घडणाऱ्या काही अनपेक्षित घटनांमुळे त्याच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो. हळूहळू त्याला जीवनाचे महत्त्व उमगू लागते.
दमदार कलाकारांची फळी
विजय सेतुपती आणि श्रुती हासन यांच्याव्यतिरिक्त ‘ट्रेन’मध्ये नासर, युगी सेथू, नारायण आणि के. एस. रविकुमार यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिस्किन यांनी केले असून, त्यांनीच चित्रपटाला संगीतही दिले आहे.
आता जवळपास तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘ट्रेन’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणारा हा थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Bipasha Basu : बिपाशा बासू वेब सिरीजच्या माध्यमातून पुन्हा एकदा काम करण्यास होणार सज्ज





