दक्षिणेतील विख्यात कवी आणि मुत्सदी तेनालीरामच्या जीवनावर आधारीत एका ऍनिमेटेड फिल्ममध्ये तेनालीरामला विवेक ओबेरॉय आपला आवाज देणार आहे. ही ऍनिमेटेड फिल्म देशभरात 12 वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यातील हिंदी आवृत्तीमध्ये तेनालीरामला विवेक ओबेरॉय आवाज देणार आहे. तमिळ, तेलगू आणि बंगाली आवृत्यांसाठी अनुक्रमे विजय सेतुपती, बी. साई श्रीनिवास आणि जीत या कलाकारांनी आपला आवाज दिला आहे. या सिनेमाच्या फर्स्ट लुकला नुकतेच ट्विटरवर शेअर केले गेले आहे. “धीरा’ असे या ऍनिमेशनपटाचे नाव असणार आहे. बॉलीवूडमधील ट्रेन्ड ऍनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटर पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. अरुण कुमार रापोलू यांनी या ऍनिमेशनपटाचे दिग्दर्शन केले आहे. अलीकडेच फिल्म इंडस्ट्रीमधील वशिलेबाजीवरून खूप मोठा गदारोळ झाला. त्यावर विवेक ओबेरॉयनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला कधीच वडिलांकडून या वशिलेबाजीचा फायदा झाला नाही. त्यामुळे या वशिलेबाजीचा आपल्याला काही अनुभवच नाही. यासंदर्भातल्या चर्चेचा मला त्रासही होत नाही. जरी वडील फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते असले. तरी आपण स्वतःचा रस्ता स्वतःच्या कष्टाने आपण स्वतःच तयार केला आहे, असे विवेक म्हणाला होता.