Marathi Sahitya Sammelan – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्राचे एक खास वैशिष्ट्य आहे. मात्र यंदाचे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल सात दशकांनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत होणार आहे. त्यामुळे या संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्रदान केला जाणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने उमेदवारांना मुंबई, दिल्ली आणि इचलकरंजी या तीन ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आमंत्रित केले. यानंतर स्थळ निवड समितीने आपला अहवाल साहित्य महामंडळ, मुंबई मराठी साहित्य संघ कार्यालयाला सादर करून आगामी 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
आगामी साहित्य संमेलनासाठी सात ठिकाणांहून निमंत्रणे प्राप्त झाली होती. मात्र साहित्य संमेलन दिल्लीत व्हावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरू होते. ‘सरहद’ या संस्थेने दिल्ली मराठी प्रतिष्ठान व दिल्लीतील अन्य मराठी संस्थांच्या सहकार्याने साहित्य संमेलन भरविण्याचा प्रस्ताव दिला होता.
साहित्य महामंडळाच्या निर्णयामुळे राजधानी दिल्लीत सात दशकांनंतर साहित्य संमेलन होणार आहे. यापूर्वी 1954 मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झाले होते. त्यामुळे तब्बल सत्तर वर्षांनी पुन्हा एकदा मराठी भाषेचा डंका दिल्लीत वाजणार आहे.
मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात, तसेच तालकटोरा स्टेडियम किंवा दिल्लीच्या मध्यवर्ती भागात आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे.
त्यामुळे या संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्रदान केला जाणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे आयोजित करण्यात आले होते.