Pune News : त्या व्हिडिओमुळे मोठा वाद पेटला; पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
Pune News : पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यावर एका व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : सोशल मीडियाचा वापर करताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन अनेकदा केले जाते. राजकीय नेत्यांसाठी हे एक महत्वाचे व्यासपीठ असले तरी त्याचा उपयोग करताना काळजी घेणे महत्वाचे मानले जाते. मात्र पुण्यात राजकीय पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
पुण्यातील कोंढवा परिसराची तुलना थेट कराशीसोबत करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. “वेलकम टू कोंढवा ऑफ पाकिस्तान” असे कॅप्शन देत एक व्हिडिओ काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि संतापाची लाट उसळली.
स्थानिक नागरिकांनी या वक्तव्यावर तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला. अनेकांनी सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला, तर काही जण थेट रस्त्यावर उतरले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते.
नेमकं प्रकरण काय?
भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने कोंढवा परिसरातून व्हिडिओ शूट करून तो ऑनलाइन शेअर केला. व्हिडिओमध्ये त्यांनी परिसरातील अतिक्रमणांवर भाष्य केलं होतं. व्हिडिओसोबत “वेलकम टू कोंढवा ऑफ पाकिस्तान” असे कॅप्शन देण्यात आले होते. तसेच व्हिडिओत कोंढव्यातील परिसराची थेट ‘कराची’शी तुलना करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कोंढवा परिसरात नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी भाजपच्या युवा मोर्चाचे पदाधिकारी सर्वेश मेहेंदळे या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 353(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला आहे. एका साध्या पोस्टपासून सुरू झालेला हा वाद आता राजकीय आणि सामाजिक पातळीवर पोहोचला आहे.
हेही वाचा : Bachchu Kadu : भाजपात प्रवेश का केला नाही? बच्चू कडू स्पष्टचं बोलले म्हणाले “विचार जुळले तरच…”





