हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज थांबली

उपचारादरम्यान झाला मृत्यू
मुंबई : राज्यासह देशाला हादरून सोडणाऱ्या हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्युशी झुंज अखेर थांबली आहे. आज पहाटे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. नागपुरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असताना सकाळी 6.55 मिनिटांनी पीडितेने अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्युशी झुंज सुरू होती, ती अपयशी ठरली.
हिंगणघाटच्या एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरूणीला आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरुणी सोमवारी सकाळी घरून हिंगणघाटला आली होती. तिच्या मार्गावर दबा धरून बसलेल्या आरोपी विकेश नगराळे याने तिला गाडीतील पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरूणीने आरडाओरड केल्यानंतर आग विझवून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते.
ऑरेंज सिटी रूग्णालयात पीडितेवर उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी 6.55 मिनिटांनी पीडितेचा रक्तदाब कमी झाला. त्यातच ह्रदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सात दिवसांपासून उपचार सुरू असताना शनिवारी पीडितेची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे तिला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. पीडिता उपचारांना प्रतिसाद देऊ लागल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले होते. त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास विशेष विमानाने मुंबईला हलवण्यासंदर्भातही विचार सुरू होता. मात्र, त्याआधीच पीडितेची प्राणज्योत मालवली. तसेच शनिवारी पीडितेने प्रथमच डोळे उघडले होते. नेत्ररोग तज्ज्ञांच्या प्राथमिक तपासणीत तिची दृष्टी कायम असल्याचे आढळले. परंतु पुढच्या तपासणीतून तिच्या दृष्टीबाबत ठोस निष्कर्ष काढता येईल, असे डॉ. नुरुल अमिन यांनी सांगितले होते.
दरम्यान, मुलीच्या मृत्युनंतर तिच्या वडिलांना दुःख अनावर झाले असून मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा. ज्या वेदना मुलीला झाल्या. त्याच वेदना आरोपीला झाल्या पाहिजे. निर्भयावर अत्याचार करणाऱ्यांसारख नको, तर लवकरात लवकर न्याय हवा, अशी संतप्त प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.





