मोरणा-गुरेघरच्या कालव्यासाठी शेकडो झाडांचा बळी

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मिळतेय बळ : पर्यावरणप्रेमींमधून होतोय आरोप

सर्रास लाकूडतोड…

तालुक्‍यात लाकूड व्यापाऱ्यांकडून झाडे तोडण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर प्रकरणे केली जातात. मात्र त्याचे कोणतेही नियम व अटी वन विभागाकडून पाळल्या जात नाहीत. नियमांना डावलून सर्रास लाकूडतोड केली जाते. पर्यायाने पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.

पाटण  – मोरणा विभागातील मोरणा-गुरेघर प्रकल्पाच्या कालव्यासाठी वन विभागाच्या परवानगी शिवाय मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे.पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या वनविभागाच्या हलगर्जी पणामुळे वृक्षतोडीला बळ मिळत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींमधून होत आहे. तर दररोज शेकडो झाडांचा बळी या कालव्यांच्या कामासाठी दिला जात आहे.

पाटण तालुक्‍यातील सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर, मोरगिरीपासून कोयनानगरच्या डोंगरमाथ्यावर तसेच मोरणा नदीच्या बाजूनेही घनदाट व विपुल प्रमाणात वनसंपदा आहे. यात काही औषधी वनस्पती आहेत तर काही मौल्यवान झाडे या परिसरात आहेत. मात्र मोरणा-गुरेघर प्रकल्पाच्या कालव्याच्या कामासाठी दररोज हजारो झाडांचा बळी दिला जात आहे. ही बाब गंभीर असून कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या लघुपाटबंधारे विभागाने यासाठी वनविभागाची परवानगी घेतली आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला तसेच झाडांची भरपाई पाटबंधारे विभागाकडून दिली जाते. मात्र झाडे तोडण्यासाठी परवानगी घेतली गेली नाही. यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्‍न आहे. मात्र वनविभागाच्या बेजाबदार पणामुळे याठिकाणी असणाऱ्या झाडांची कत्तल राजरोसपणे केली जात आहे. मोरगिरीच्या वरच्या बाजूस तसेच आंब्रग गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे तोडून पर्यावरणाची हानी याठिकाणी झाली आहे. मोरणा-गुरेघरच्या कालव्यासाठी झाडे तोडताना वनविभागाची कोणतीही परवानगी घेतली गेली नाही.

सध्या मोरणा-गुरेघरच्या उजव्या कालव्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कामासाठीही झाडे तोडली जात आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येते. त्यांच्या संगोपणासाठी मोठा खर्चही शासनाच्या वन विभागाकडून केला जात आहे. मात्र झाडे लावा झाडे जगवा व पुन्हा झाडे तोडा असा कार्यक्रम राबविला जात आसल्याने पर्यावरण प्रेमींमधून नाराजी व्यक्‍त केली जात आहे.

मोरणा-गुरेघर प्रकल्पाच्या कालव्यांच्या कामासाठी झाडे तोडण्यात येत असतील तर त्याची चौकशी करण्यासाठी वनपालांना त्याठिकाणी पाठवू. कालव्याच्या बाजूलाही वृक्षतोड करण्यात येत असेल तर त्याठिकाणी परवानगी घेतल्याची खातरजमा केली जाईल.

विलास काळे वनअधिकारी, पाटण 

Leave A Reply

Your email address will not be published.