Pimpri : अवघाचि विठ्ठलामुळे चैतन्याचा ठसठशीत रंग

निगडी : प्रभाग क्रमांक १५ निगडी प्राधिकरणमधील ग. दि. माडगुळकर सभागृहात आषाढी एकादशीनिमित्त अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन व स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने आयोजित ‘अवघाचि विठ्ठलू’ या भक्तिपूर्ण कार्यक्रमात विठ्ठल भक्तीचा झंकार अनुभवायला मिळाला.
‘ज्ञानोबा माउली तुकाराम’च्या जयघोषाने सभागृह दुमदुमले, तर ‘जय जय रामकृष्ण हरी’च्या गजराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सावळ्या विठ्ठलाच्या पूजनानंतर माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
मधुर गायन, नृत्य, वादन व चित्रकलेने सजलेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ नागरिकांपासून तरुणाईपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘उठी उठी गोपाळा’, ‘अमृताहुनी गोड’, ‘देव माझा विठू सावळा’, ‘मोगरा फुलला’, ‘वृक्षवल्ली आम्हा’ यांसारख्या गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचा समारोप ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा’, ‘घालीन लोटांगण’ व ‘बोला पुंडलिक वरदाहरी विठ्ठल’ या गजरात झाला. संपूर्ण सभागृहात जणू पंढरपूरची वारीच अवतरली होती, असा भक्तिपूर्ण अनुभव उपस्थितांनी घेतला.





