- उद्योग, दुकाने बंद तरीही मुबलक पिशव्या
पिंपरी – “करोना’ विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता लॉकडाऊन सुरू असताना शहरामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर वाढल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग व दुकाने बंद असतानाही प्लॅस्टिकच्या पिशव्या आल्या कोठून, असा प्रश्न त्यामुळे निर्माण होत आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात 24 मार्चपासून लॉकडाऊन सुरू केला आहे. हा लॉकडाऊन सुरुवातीला 14 एप्रिलपर्यंतच होता. मात्र, केंद्र सरकारने 3 मे पर्यंत हा लॉकडाऊन वाढविलेला आहे. लॉकडाऊन वाढविताना सोमवारपासून (दि. 20) काही उद्योग सुरू करण्यास मात्र अटी-शर्ती लागू करून परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, लॉकडाऊनपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका आरोग्य विभागाकडून प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्लॅस्टिक पिशव्यांची जप्ती आणि त्याबाबत दंडात्मक कारवाई सुरू होती. मात्र, करोना विषाणूचा संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाऊन सुरू झाले. लॉकडाऊनच्या कालावधीत प्लॅस्टिक बंदीबाबतची कार्यवाही पूर्णत: थंडावली आहे.
पर्यायाने, सध्या किराणा मालाच्या दुकानांमध्ये आणि भाजी विक्रेत्यांकडून सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्या देण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्याशिवाय, गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अन्नधान्यासाठी देखील या पिशव्यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने लागू केलेली प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र सद्य:स्थितीत पाहण्यास मिळत आहे.
शहरात सध्या करोना विषाणूमुळे वाढलेला संसर्ग लक्षात घेता आरोग्य विभागाकडून त्याबाबत आवश्यक उपाययोजनांवर सध्या प्राधान्याने भर दिला जात आहे. त्यामुळे बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या विक्री विरोधात महापालिका प्रशासनाने सुरू केलेली दंडात्मक कारवाई तूर्तास थांबविली आहे.
– डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.सध्या करोनाचे संकट आहे. मात्र, अशा परिस्थितीत प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे. नागरिकांनी प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर कसोशीने टाळणे गरजेचे आहे. त्या ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा. नागरिक घरातच अशा कापडी पिशव्या बनवू शकतात.
– विकास पाटील, पर्यावरण तज्ज्ञ.