भारताने पाकिस्तानचे एफ 16 विमान पाडल्याचा दावा अमेरिकेने फेटाळला

आम्ही दिलेली सर्व विमाने पाकिस्तानात शाबुत
वॉशिंग्टन: आम्ही पाकिस्तानला जितकी एफ 16 विमाने दिली आहेत ती जशीच्या तशी शाबूत आहेत. आम्ही प्रत्यक्ष जागेवर जाऊन ती विमाने मोजली आहेत त्यामुळे पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याच्यावेळी वापरलेले एफ 16 विमान आम्ही पाडले हा भारताचा दावा चुकीचा आहे असे अमेरिकेने म्हटले आहे.

अमेरिकेच्या संरक्षण विभागातील दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असल्याचे वृत्त एका अमेरिकन मासिकाने प्रसारीत केले आहे. या मासिकाने या दोन वरीष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांची मुलाखत प्रसिद्ध केली आहे त्यात त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की आम्ही स्वता इस्लामाबादला जाऊन ही विमाने मोजून आलो त्यातील एकही विमान गायब झालेले नाही असे त्यांचे म्हणणे आहे. भारताच्या लढाऊ विमानाचा वैमानिक अभिनंदन वर्धमान याने भारताच्या हद्दीत हल्ला करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी विमानांचा पाठलाग करून त्यातील एक एफ 16 हे विमान पाडले असल्याचा दावा भारतीय हवाईदलाने केला आहे.

अमेरिकेने दहशतवादाच्या विरोधातील लढाईसाठी एफ 16 ही विमाने पाकिस्तानला वापरण्यासाठी दिली होती. त्याच वेळी भारताने त्यावर आक्षेप घेतला होता. या विमानांचा वापर भारताच्या विरोधात होऊ शकतो असा आरोप भारताने केला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशांतील तणावाच्यावेळी लढाऊ विमानांमध्ये जी डॉग फाईट झाली होती त्यात पाकिस्तानने या विमानांचा वापर केल्याचा भारताचा आरोप होता. त्याची अमेरिकेने चौकशी करावी अशी मागणीही भारताने केली होती. भारतीय हवाईदलाने 28 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत असा आरोप केला होता की भारतीय विमानावर एमआरएएएम क्षेपणास्त्राचा मारा करण्यात आला. अशा प्रकारच्या क्षेपणास्त्राचा मारा केवळ एफ 16 विमानाद्वारेच केला जातो. याचाच अर्थ पाकिस्तानने आमच्या विरोधात एफ 16 विमानांचा वापर केला होता असे सिद्ध होते असे भारतीय हवाईदलाचे म्हणणे होते. पण भारताच्या या दाव्यात तथ्य नाही असे अमेरिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.