नवी दिल्ली – अपुर्या पायाभूत सुविधामुळे व्हेनेझुएलातील क्रुड तेलाचे उत्पादन सध्या 8 लाख पिंप प्रति दिवस या पातळीवर आहे. जर अमेरिकेने या क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढविल्या तर या खनिज तेलाचे उत्पादन पुढील दशकात 25 लाख पिंप प्रति दिवस जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जागतिक बाजारात खनिज तेलाचा पुरवठा वाढून खनिज तेलाचे दर मर्यादित पातळीवर राहण्यास मदत होईल असे काही विश्लेषकांनी नमूद केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामधील तेल उत्पादनांचा व्हेनेझुएलातील जनतेला फायदा होत नाही असे म्हटले आहे. आता लोकशाहीच्द्वारा नवीन प्रशासन आल्यानंतर आणि तेथील पायाभूत सुविधांमध्ये वाढ केल्यानंतर पुढील दोन वर्षात तेलाचे उत्पादन 14 लाख पिंप प्रती दिवस आणि पुढील दहा वर्षात 25 लाख पिंप जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेतील तेल कंपन्यांना आणि व्हेनेझुएला सरकारला आणि जनतेला या वाढीव महसुलाचा लाभ होऊ शकतो. त्याचबरोबर जागतिक बाजारात जास्त पुरवठा होऊ शकते असे समजले जाते. ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, व्हेनेझुएलातील तेल उत्पादन यावर्षी 30 ते 50 दशलक्ष पिंपापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यावर अमेरिकेचे नियंत्रण राहील. बाजार भावाप्रमाणे हे तेल जागतिक बाजारात उपलब्ध केले जाईल. या तेल विक्रीवर अमेरिकेचे नियंत्रण राहील. या तेलाचा फायदा अमेरिकन जनतेला आणि व्हेनेझुएलाच्या जनतेला होईल असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या तीन बलाढ्य कंपन्यांना पुन्हा ट्रम्प व्हेनेझुएलातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि तेलाचे उत्पादन अमेरिकेत पाठविण्यासाठी आग्रह करीत आहेत. मात्र व्हेनेझुएलाचे नागरिक ट्रम्प यांच्या या प्रस्तावाला कसा प्रतिसाद देतात यावर बरेच काही अवलंबून आहे. व्हेनेझुएलात जगातील एकूण तेलाच्या 17 टक्के म्हणजे 300 अब्ज पिंप तेल असल्याचे समजले जाते.