वॉशिंग्टन/नवी दिल्ली: उत्तर अटलांटिक महासागरात अमेरिकन नौदलाने एका मोठ्या कारवाईत रशियन ध्वज असलेला ‘मरिनेरा’ हा तेल टँकर जप्त केला आहे. वेनेझुएलावरील आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे उल्लंघन करून तेलाची अवैध तस्करी केल्याचा गंभीर ठपका या जहाजावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईत जहाजावरील २८ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यात ३ भारतीय नागरिकांचा समावेश असल्याने भारताचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. अमेरिकन कोस्ट गार्ड आणि लष्करी दलांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मरिनेरा’ हे जहाज मूळचे ‘बेला-१’ या नावाने कार्यरत होते. निर्बंधांपासून वाचण्यासाठी या जहाजाचे नाव आणि ध्वज वारंवार बदलण्यात आले होते. हे जहाज ‘शॅडो फ्लीट’चा भाग असल्याचे अमेरिकेचे म्हणणे असून, रशिया, इराण आणि वेनेझुएला यांच्यातील प्रतिबंधित तेलाच्या व्यापारासाठी याचा वापर होत होता. अमेरिकन होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांनी या मोहिमेची माहिती देताना सांगितले की, हे जहाज अनेक आठवड्यांपासून अमेरिकन यंत्रणांना चकवा देत होते, मात्र कोस्ट गार्डच्या जवानांनी भर समुद्रात हेलिकॉप्टरच्या मदतीने थरारक मोहीम राबवून हे जहाज जप्त केले. रशिया टुडे या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जप्त केलेल्या जहाजावर एकूण २८ कर्मचारी असून त्यामध्ये ३ भारतीयांसह १७ युक्रेनियन, ६ जॉर्जियन आणि २ रशियन नागरिकांचा समावेश आहे. रशियाच्या वाहतूक मंत्रालयाने या जहाजाशी संपर्क तुटल्याची पुष्टी केली आहे. दरम्यान, या सर्व क्रू मेंबर्सना अमेरिकेत नेऊन त्यांच्यावर खटला चालवला जाण्याची शक्यता व्हाईट हाऊसने व्यक्त केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु तेथील भारतीय दूतावास अडकलेल्या तीन भारतीयांच्या सुरक्षेबाबत माहिती घेत आहे. रशियाने अमेरिकेच्या या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला असून याला ‘खुली समुद्री चाचेगिरी’ म्हटले आहे. रशियन खासदार आंद्रेई क्लिशास यांच्या मते, आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करून रशियन ध्वज असलेल्या जहाजावर अमेरिकेने बळाचा वापर केला आहे. ही कारवाई अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वेनेझुएला विरोधी धोरणाचा एक भाग मानली जात आहे. वेनेझुएलाच्या तेलातून मिळणारा पैसा अवैध कामांसाठी वापरला जात असल्याचा अमेरिकेचा दावा असून, या कारवाईमुळे अमेरिका आणि रशियामधील तणाव अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.