satara | आगामी निवडणूक पाणीप्रश्नावरील शेवटची

वडूज, (प्रतिनिधी)- आजपर्यंतच्या विधानसभेच्या तिन्ही निवडणुका पाणीप्रश्न सोडविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून लढल्या. प्रत्येक निवडणुकीत दिलेले शब्द पूर्ण करुन तीन टप्प्यांतील विविध योजनांचे पाणी माण- खटावला आणले आहे.
आता टेंभू योजनेअंतर्गत ४२, जिहे कठापूर अंतर्गत उत्तर पश्चिम माणमधील गावे, औंधसह २० गावांचा पाणीप्रश्न अंतिम टप्प्यात आणला आहे, त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक पाणीप्रश्नावरील माझी शेवटची निवडणूक असेल, असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. जनतेची इमाने इतबारे सेवा करणारे कार्यकर्तेच माझी ताकद असल्याचेही त्यांनी सांगितले.
खटाव तालुका भाजपतर्फे वडूज येथे आयोजित आभार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आ. दिलीप येळगावकर, भाजप जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा, डॉ. वैभव माने, तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, नगराध्यक्षा मनीषा काळे, भरत जाधव, प्रा. बंडा गोडसे, नंदूभैय्या गोडसे, शिवाजी सर्वगौड, बुधे बापू, विशाल बागल, सोमनाथ भोसले, नवल थोरात, रामभाऊ देवकर, प्रदीप शेटे, नाना पुजारी, सुनील गोडसे, काकासाहेब बनसोडे, अमोल मोरे, वडूजच्या आजी, माजी नगरसेवकांची उपस्थिती होती.
आ. गोरे म्हणाले, प्रतिकूल परिस्थिती असतानाही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम केल्याने लोकसभा निवडणुकीत विरोधकांचे मनसुबे उधळून लावत खटाव तालुक्यात भाजपला मताधिक्य मिळाले. प्रत्येक गावात आणि वाडीवस्तीवर विकासकामे करुन जीवाभावाची माणसे आणि कार्यकर्ते जोडले आहेत.
खटाव तालुक्यातून मला प्रत्येक निवडणुकीत पूर्वीपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. हे जनमत मी मोठ्या कष्टाने उभे केले आहे. त्यामुळेच सगळे विरोधक एकत्र असतानाही लोकसभा निवडणुकीत आम्हाला मताधिक्य मिळाले.
लोकसभा तो झॉंकी है , विधानसभा तो अभी बाकी है, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
मतदारसंघातील एकवटलेल्या २२ विरोधकांनी एका व्यासपीठावर येऊन माझ्याशी विकासकामांवर, पाणीयोजनांवर खुली चर्चा करावी.
मी १५ वर्षात काय केले याचा फैसला जनतेच्या दरबारात करुन टाकू. माझे राजकारण दुष्काळमुक्तीचे आहे. त्यात मी यशस्वी होत आलो आहे. खटाव माणमध्ये उरमोडी, जिहे कठापूर, तारळी योजनांचे पाणी आणले.
कलेढोण, मायणी, कुकुडवाडसह ४२ गावांसाठी टेंभू योजनेची सातशे कोटींची कामे सुरु होत आहेत. उत्तर माणला पाणी देणारी जिहे कठापूरची वाढीव आंधळी योजना अंतिम टप्प्यात आहे.
पश्चिम भागातील गावांना पाणी मंजूर होऊन सर्वेक्षण सुरु झाले आहे. हिंगणीत लवकरच पाणी पोहचणार आहे. औंधसह २० गावांना पाणी देण्याचा शब्द मी दिला आहे.
येरळवाडी धरण आणि वन विभागाचा प्रश्नही आपण मार्गी लावत आहोत. त्यामुळे बारामती आणि फलटणच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, अशी टीका गोरे यांनी केली.
डॉ. येळगावकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीत माढ्यात विरोधकांनी खोट्या गोष्टी मतदारांवर बिंबवल्या. जातीपातीचे राजकारण त्यांनी केले. हे असले उद्योग सुरु झाले त्या फलटण मतदारसंघातील विरोधी नेत्यांना घरी बसा असा संदेश मतदारांनी दिला.
मायणीच्या विरोधी नेत्याला तर मतदानासाठी दोन तास गावात येण्याची मुभा मिळाली होती. तालुक्याला न्याय देणाऱ्या आ. गोरेंना साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रा. बंडा गोडसे यांनी मनोगत व्यक्त केले.
धनंजय चव्हाण यांनी प्रास्ताविकात तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मताधिक्याचा लेखाजोखा मांडला.





