पुणे-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांची अन्य विद्यापीठात कुलगुरूपदी नियुक्ती होण्याची परंपरा कायम राहिली आहे. विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागातील प्राध्यापक व प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांची नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कार्यकर्तृत्वासह प्राध्यापकांमुळेही विद्यापीठाच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे.
पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या प्रा. शांतिश्री पंडित यांची दिल्लीतील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरूपदी वर्षभरापूर्वी नियुक्ती झाली होती. विद्यापीठातील एका महिला प्राध्यापकाची पहिल्यांदाच कुलगुरूपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर आता डॉ. संजीव सोनवणे यांनी मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून सूत्रे स्वीकारली आहे.
यावरून विद्यापीठातील प्राध्यापकांची गुणवत्ता
अधोरेखित होत आहे. एवढेच नव्हे, तर “नॅक’ व “यूजीसी’च्या उच्च पदावरही विद्यापीठातील प्राध्यापकांनी आपले कर्तृव गाजविले आहे. या प्राध्यापकांमुळे विद्यापीठाची प्रतिमा उंचावली आहे. यापूर्वी विद्यापीठातील प्रा. एन. जी. पवार, डॉ. एम. जी. ताकवले, प्रा. पंडित विद्यासागर, प्रा. आर. एस. माळी, डॉ. एस.एफ. पाटील, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. बी. ए. चोपडे, प्रा. दिलीप उके, प्रा. राम ताकवले, डॉ. डी. एन. देवबागकर, प्रा. टी. एस. एन. शास्त्री यांची अन्य विद्यापीठांत कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे.
विद्यापीठातील प्राध्यापकच कुलगुरूपदी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातच कार्यरत असलेले प्राध्यापकच पुणे विद्यापीठात कुलगुरू म्हणून कार्यकीर्द भूषविली आहे. प्राचार्य दे. अ. दाभोळकर, डॉ. राम ताकवले, डॉ. वि. ग. भिडे, डॉ. श्रीधर गुप्ते, डॉ. अरुण निगवेकर, डॉ. अशोक कोळस्कर, डॉ. वासदेव गाडे आणि डॉ. नितीन करमळकर हेच पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. विद्यापीठात प्राध्यापकच त्याच विद्यापीठात कुलगुरू म्हणून नियुक्ती होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यावरून विद्यापीठातील प्राध्यापक संशोधन, गुणवत्तेत सरस असल्याचे स्पष्ट होत आहे.
नवे कुलगुरूही पुणे विद्यापीठातील?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त आहे. आता निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून, एक-दोन दिवसांत नव्या कुलगुरूंची घोषणा होणार आहे. त्यात शेवटच्या टप्प्यात पाच प्राध्यापकांची निवड करण्यात आली आहे. त्यात चार पुणे विद्यापीठातील आहेत. त्यामुळे आता पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून विद्यापीठातील प्राध्यापकच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.