Pimpri : साई उद्यानाचा बकाल चेहरा उघड!

चिखली : संभाजीनगर येथील साई उद्यान हे परिसरातील एकमेव मनोरंजनाचे ठिकाण आहे. असे असले तरी सध्या या उद्यानाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. झोपाळे तुटलेले, खेळण्यांचे साहित्य मोडकळीस आलेले आणि झाडाझुडपांनी वेढलेला संपूर्ण परिसर, अशी विदारक स्थिती निर्माण झाली आहे.
उद्यानातील झोपाळे पूर्णतः तुटले असून त्यांच्या जागी आता पावसाचे डबके साचले आहेत. परिणामी, लहान मुलांऐवजी काही ठिकाणी तरुण मुलं खेळताना दिसतात, ही चिंतेची बाब आहे. उद्यानातील झुडपं वाढून सुंदरता नाहीशी झाली आहे. ओपन जिमचे साहित्यही तुटल्यामुळे बंद अवस्थेत आहे. यामुळे बच्चे कंपनी आणि पालक नाराज आहेत.
शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमध्ये शाळकरी मुलांना खेळण्यासाठी येण्याची जागा असलेल्या या उद्यानात मुलांचा हिरमोड होत आहे. पालक व स्थानिक नागरिक याकडे लक्ष देण्याची मागणी करीत आहेत. याच भागातील सेक्टर १६ मधील सावता महाराज उद्यानाचीदेखील तीच अवस्था असून, याकडेही उद्यान विभागाचे दुर्लक्ष सर्वत्र जाणवत आहे. प्रशासक आणि महापालिकेने तातडीने लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
महापालिकेला कोण दंड करणार?
नागरिकांच्या घरात किंवा दुकानात पाणी साचून त्यात डेंगी डासांची पैदास होते. त्यामुळे महापालिकेने अनेकांना दंड केला आहे. मात्र संभाजीनगर येथील साई उद्यान हे परिसरात पावसाचे पाणी साचत असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महापालिकेला कोण दंड करणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
मुलांना जर खेळणी नीटनेटकी नसतील तर उद्यानात जाऊन काहीही फायदा नाही. मुलांच्या पदरी निराशा पडत असून त्यांना मोबाइल मधून बाहेर काढण्याचा आमचा प्रयन्त आहे परंतु उद्यानातील अवस्था पाहून मुले घरी राहणेच पसंत करतात. लवकरात लवकर खेळणी दुरुस्त करावीत अन्यथा नवीन बसवावीत.
– रेश्मा पाटील, गृहिणी





