पुणे | रक्त नमुने बदलणाऱ्या दोघांचा जामीन फेटाळला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोर्श कारचालकाच्या दोन अल्पवयीन मित्रांच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलण्यात सक्रिय सहभाग असलेल्या दोन आरोपींचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला.
रक्ताच्या नमुन्यात अदलाबदल आणि त्याचा खोटा अहवाल तयार करणे म्हणजे बहुमूल्य दस्तावेजांचे बनावटीकरण आहे, असे निरीक्षण नोंदवित विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.
आदित्य अविनाश सूद (वय ५२, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) आणि आशिष सतीश मित्तल (वय ३७, रा. विमाननगर) अशी दोघांची नावे आहेत.
कल्याणीनगर येथे १८ मे च्या मध्यरात्री अल्पवयीन मुलाने पोर्श कार भरधाव चालवून धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता.
कारचालक मुलगा व पाठीमागच्या सीटवर असलेल्या दोन मित्रांनी अपघाताच्या घटनेपूर्वी मुंढव्यातील दोन पबमध्ये मद्यपान केले होते.
त्यामुळे त्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे कारचालकाच्या दोन अल्पवयीन मित्रांना वाचविण्यासाठी आदित्य सूद व आशिष मित्तलने ससूनच्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर व न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिली.
त्यानंतर आदित्य सूदने एका मुलाच्या रक्ताच्या नमुन्याच्या जागी स्वतःच्या रक्ताचा नमुना दिला, तर आशिष मित्तलने आरोपी अरुणकुमार सिंग याच्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलाच्या जागी स्वतःचे रक्त दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
अटकेच्या भीतीने आरोपींचे पलायन
आदित्य सूद संरक्षणविषयक उपकरणांच्या निर्मितीचा व्यवसाय आहे, तर आशिष मित्तल याचा जागा खरेदी- विक्रीचा व्यवसाय आहे. पोर्श कारचालकाच्या दोन अल्पवयीन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आपला सहभाग उघड झाल्यावर दोघे अटकेच्या भीतीने परराज्यात पळून गेले होते.
पुणे पोलिसांची पथके आपल्या मागावर असल्याचे कळताच आरोपी पुण्यात परतले आणि पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर न्यायालयीन कोठडी झाल्यावर दोन्ही आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता.
त्याला विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी विरोध केला. विविध साक्षीदारांचे जबाब आणि सीए अहवालाच्या आधारे दोन्ही आरोपींचा रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकारात सहभाग असल्याचे विशेष सरकारी वकील हिरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.





