पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार गटाचे नेते दत्ता धनकवडे यांनी मोठा दावा करत सांगितले की, शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असून, फक्त अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. ही घोषणा लवकरच, कदाचित आज-उद्या दोन दिवसांत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धनकवडे माध्यमांशी बोलताना म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणारच आहेत. याबाबत चर्चा झाल्या आहेत, सगळा तिढा सुटला आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, शशिकांत शिंदे आणि प्रशांत जगताप यांसारखे वरिष्ठ नेते एकत्र बसून हा निर्णय घेतील. तुतारी चिन्हावरील उमेदवारही घड्याळ चिन्हावर लढतील. लवकरच चांगली बातमी मिळेल, असं धनकवडे यांनी म्हटले आहे. मात्र, शरद पवार गटाकडून या दाव्याला तात्काळ दुजोरा मिळालेला नाही. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले की, अजित पवार गटाकडून एकत्र लढण्याबाबत अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यावर योग्य निर्णय घेऊ, असं प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले जात असे. तसेच आता जिल्हा आणि शहराध्यक्षांना मत विभागणी टाळण्यासाठी निर्णय घेण्याची मुभा आहे. मत विभागणी टाळली तर विजय सोपा होतो. पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याने महायुतीला मजबुती मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पुढील काही दिवसांत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.