“भाजपने लोकसभा निवडणुकीवेळी दाखवलेला विश्वास…”; राज्यसभेवर नियुक्ती होताच उज्जवल निकमांची प्रतिक्रिया

Ujjwal Nikam | ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेतील पराभवानंतर निकम यांचे आता खासदारकीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रपती नियुक्त सदस्य असल्यामुळे माझ्यावर ही मोठी जबाबदारी असणार आहे, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे देखील आभार मानले.
वकील उज्ज्वल निकम काय म्हणाले?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी मराठीत संभाषण केलं आणि मला सांगितलं की राष्ट्रपती तुमच्यावर एक जबाबदारी सोपवू इच्छित आहेत. ही जबाबदारी देशाच्या दृष्टीकोनातून तुम्ही चांगली सांभाळाल अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो. भाजपाने मला जेव्हा लोकसभेची उमेदवारी दिली होती, तेव्हा पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने माझ्यावर लोकसभेच्या निवडणुकीत जो विश्वास दाखवला होता तो विश्वास मी यावेळी सार्थ करून दाखवेन,” असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. Ujjwal Nikam |
“कायद्याचा अभ्यास आणि कायद्याचं विश्लेषण आणि या देशाच्या ऐक्यासाठी, देशातील लोकशाही आणि देशाचं संविधान कशा पद्धतीने प्रबळ राहील याची काळजी घेण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. महाराष्ट्राच्या जनतेला मी आश्वासित करतो, कारण महाराष्ट्रातून माझ्या एकट्याचीच नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे. त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मी आभार व्यक्त करतो,” असेही उज्ज्वल निकम म्हणाले. Ujjwal Nikam |
चार जणांची राज्यसभेवर नियुक्ती
उज्ज्वल निकम यांच्याबरोबरच भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचीही राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या केसेस मध्ये सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी काम पाहिले होते. गुलशन कुमार हत्याकांड, प्रमोद महाजन हत्या, 2008 मध्ये मुंबईवर झालेला हल्ला, कोपर्डी बलात्कार या हायप्रोफाईल केसमध्ये त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील सरकारी विशेष सरकरी वकील म्हणून ते काम पाहत आहेत. Ujjwal Nikam |
हेही वाचा :





