बॉलीवूडने आतापर्यंत एकपेक्षा एक विनोदी चित्रपट दिले आहेत. “हेरा फेरी’पासून ते “धमाल’पर्यंत सर्व चित्रपटांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे, पण त्यानंतर एक चित्रपट प्रदर्शित झाला ज्यात विनोदाबरोबरच रोमांचही चाहत्यांना अनुभवता आला. पुलकित सम्राट यांचा “फुकरे’ हा चित्रपट 2013मध्ये प्रदर्शित झाला.
हा चित्रपट इतका यशस्वी झाला की पाच वर्षांनंतर त्याचा सिक्वेलही बनला. आता मेकर्स “फुकरे-3’च्या तयारीत असून स्टार कास्टमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे समजते. या चित्रपटात पुलकित सम्राट, वरुण शर्मा आणि ऋचा चढ्ढा यांची तिकडी काम करणार आहे. याबाबत खुद्द पुलकितने माहिती दिली आहे.
एका मुलाखतीत पुलकित म्हणाला, “फुकरे-3’ची स्टार कास्ट तयार असून स्क्रिप्टचे कामही पूर्ण झाले आहे. आता लवकरच डेट्स निश्चित करण्यात येणार आहेत. आपण संपूर्ण टीमसह पुन्हा या चित्रपटात काम करण्यासाठी खूप उत्साही असल्याचे त्याने सांगितले. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास पुलकित आपल्या आगामी “हाथी मेरे साथी’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून लवकरच “फुकरे 3’चे काम सुरू करणार आहे. तसेच पुलकितचा “तैश’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. यातील त्याच्या भूमिकेने सर्वांची मने जिंकली होती.