-मसापच्या संकेतस्थळावरून मोफत डाउनलोड करता येणार
– ग्रंथांच्या डिजिटायझेशनचा पहिला टप्पा पूर्ण
पुणे – महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात साहित्य रसिकांची मांदियाळी आहे. मराठी साहित्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या साहित्य रसिकांसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे (मसाप) 100 वर्षांपूर्वीच्या दुर्मीळ ग्रंथांचा खजिना खुला करण्यात आला आहे. मसापच्या अधिकृत संकेतस्थळावर हे दुर्मीळ ग्रंथ साहित्यप्रेमींना मोफत डाउनलोड करता येणार आहेत.
राज्यातील महत्वाची साहित्यिक संस्था असलेल्या मसापच्या कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या सहकार्याने हे काम पुर्ण करण्यात आले असून, यामध्ये सुमारे शंभर वर्षांपूर्वीपसूनची दुर्मिळ ग्रंथे सामाविष्ट आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण 163 ग्रंथांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मसापच्या www. masapapune.org या संकेतस्थळावरील इ-दुर्मीळ ग्रंथपेढीवरून हे दुर्मीळ ग्रंथ साहित्यप्रेमींना मोफत डाउनलोड करता येणार आहेत.
याबाबत मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी म्हणाले, “साहित्य परिषदेचे भूषण असलेले कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालय नेहमीच साहित्यप्रेमी, अभ्यासक आणि संशोधकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेले आहे. दीडशे-दोनशे वर्षांपूर्वीच्या दुर्मीळ ग्रंथांची अवस्था पाहता त्यांचे जतन करण्यासाठी डिजिटायझेशन करण्याची गरज होती. त्यासाठी मसापच्या कार्यकारी मंडळाने पुढाकार घेतला.
“ग्रंथ दत्तक योजना’ जाहीर करून देणगीदारांना आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळाला तसेच पदाधिकाऱ्यांनी आणि जिल्हा प्रतिनिधींनीही ग्रंथ दत्तक घेतले. त्यातून पहिल्या टप्प्यात दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले. दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा पाठपुरावा ग्रंथालय विभागाचे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी केला. हे दुर्मीळ ग्रंथ केवळ “मसाप’ चे नाहीत. जगभरातील साहित्य प्रेमीं, संशोधक आणि अभ्यासक यांचा त्यावर अधिकार आहे. या सर्वांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी हे दुर्मीळ ग्रंथ संकेतस्थळावरून मोफत डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.’