पिकामध्ये सोडली जनावरे : पुरंदर तालुक्यातील अर्थकारण मंदावले भुलेश्वर- पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये बाजारभाव नसल्यामुळे टोमॅटो पिकामध्ये जनावरे सोडण्यात आली आहेत. लाखो रुपये खर्च करून हातातोंडाशी आलेला टोमॅटो मातीमोल झाला आहे. ऐन तोडणी सुरू होण्याच्या तोंडावर करोनाचा फटका या पिकाला बसला आहे. त्यामुळे हतबल शेतकऱ्यांना जनावरे चरताना हताशपणे पाहावे लागत आहे. जानेवारीमध्ये टोमॅटोची रोपांची लागवड केल्यानंतर अडीच ते तीन महिन्यांत तोडणीस सुरूवात होते. यावर्षीदेखील जानेवारीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटोची रोपांची लागण केली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात याला फळेसुद्धा आली आहेत. मात्र, उत्पादन हातामध्ये येण्यास व करोना आजाराचे संकट येण्यास एकाचवेळ गाठ पडली. त्यामुळे टोमॅटोची पिके शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेले. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्यामुळे टोमॅटो घेऊन जाणार तरी कुठे म्हणून शेतकऱ्यांनी तोडणी सुद्धा केली नाही. त्यामुळे टोमॅटो झाडावरच पिकली आहेत. पिकलेल्या टोमॅटोला जास्त मागणी नसते. परिणामी पिक वाया जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी जनावरे या पिकांमध्ये सोडावी लागली आहेत. जनावरांसाठी इतर चारासुद्धा लॉकडाऊनमुळे उपलब्ध होत नाही. टोमॅटोचे पीक घेण्यासाठी रोपांची लागण केल्यापासून उत्पादन निघेपर्यंत सरासरी एकरी 40 हजार रुपये खर्च येतो. मात्र, यावर्षी बहुतांशी शेतकऱ्यांचा हा खर्च पाण्यातच गेला आहे. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात वाघापूर, बेलसर, राजेवाडी, पिसर्वे, माळशिरस, नायगाव आदी गावांमध्ये पीक घेतले जाते. यापैकी फक्त बेलसर गावात तर दरवर्षी अडीच हजार एकरांपेक्षा जास्त उत्पादन टोमॅटोचे घेतले जाते. या माध्यमातून बेलसर येथे दरवर्षी 3 ते 4 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. परंतु करोना आणि लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना चार कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. मार्च ते मे या कालावधीत टोमॅटोचे खऱ्या अर्थाने उत्पादनात वाढ होत आहे. मात्र, करोनामुळे भाववाढ आणि बाजारपेठच नसल्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत आकंठ बुडाला आहे. नगदी पीक असल्याने टोमॅटोचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. जवळच सासवड व पुणे बाजारपेठेत 200 ते 400 रुपये प्रति कॅरेटप्रमाणे माल विकला जातो. मात्र, यावर्षी बाजारपेठ बंद असल्याने मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. – बाळासाहेब किसन यादव, शेतकरी, माळशिरस.