पुणे – सध्याचा तापमानवाढीचा “ट्रेन्ड’ पाहता, यंदा भारतासह उपखंडातील मोसमी पावसावर “अल-निनो’चा धोका असल्याचे गृहितक मांडले जात आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊन देशाला दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन पिकांवरही वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कमी उत्पादन होण्याचा अंदाज काही अभ्यासगट मांडत आहेत. दरम्यान, संपूर्ण जगाच्या हवामान आणि पर्जन्यमानावर “अल-निनो’चा थेट परिणाम होतो. “अल-निनो’ म्हणजे काय? पॅसिफिक महासागरातील पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा अधिक वाढल्या त्याला “अल-निनो’ परिणाम म्हणतात. याचा परिणाम नैऋत्य मोसमी पावसावर दिसून येतो. “अल-निनो’ या स्पॅनिश शब्दाचा अर्थ बाल येशू किंवा छोटा मुलगा असा सांगितला जातो. “ला-निना’ म्हणजे काय? “ला-निना’ इफेक्ट असतो, तेव्हा उष्णकटिबंधातील पश्चिम-प्रशांत महासागराचे पाणी नेहमीपेक्षा थंड होते. या काळात “ला निना’ प्रभावी होतो आणि आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये भरपूर पाऊस पडतो. “ला निना’ म्हणजेच लहान मुलगी असा होतो. उष्णतेचे कारण काय? जागतिक स्तरावर हे वर्ष मागील दोन वर्षांपेक्षा थोडे अधिक उष्ण असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण, भारतासह जगभरातील अनेक देशांत फेब्रुवारीत लक्षणीय उष्णता नोंदवली गेली आहे. दरम्यान, मागील पाच-सहा वर्षे जगभरात “ला निना’ परिस्थिती होती. त्यामुळे आपल्या वातावरणावरही थंड प्रभाव होता. पण, आता सलगतेनंतर “ला निना’चा प्रभाव हळूहळू कमी होत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अमेरिकेतील संस्थेचे निरीक्षण याबाबत अमेरिकेच्या “नॅशनल ओशियानिक अँड ऍटमॉस्फरिक ऍडमिनिस्ट्रेशन’ने हा अंदाज वर्तवला आहे. मे-जूनच्या दरम्यान “अल-निनो’ प्रभाव असू शकतो. या कालावधीमध्ये ऊन आणि पावसाळा असे दोन्हीही ऋतू एकत्र असतील. तर मान्सून जून ते सप्टेंबरपर्यंत सक्रिय राहील. पण, पाऊस खंडित राहिल अशी माहिती समोर आली आहे.