तिसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या

ना मोठ्या सभा, ना आरोप-प्रत्यारोप

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभा पाहिजे त्या प्रमाणात झाल्या नाहीत, शिवाय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या नाहीत. मात्र, त्याच वेळी उमेदवारांनी प्रचार फेऱ्यांनी आणि पदयात्रांनी शहर पिंजून काढत केलेल्या प्रचाराने पुण्यातील प्रचाराची सांगता झाली. यंदाच्या प्रचाराला प्रामुख्याने कडाक्‍याच्या उन्हाचा फटका बसला असून शहराचा विस्तार आणि प्रचारासाठी असलेल्या वेळेसोबत आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीचा परिणामही दिसून आला आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या मंगळवारी (दि.23) मतदान होत आहे. पुण्यातून सुमारे 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी ही लढत प्रामुख्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी आणि भाजप-शिवसेना महायुती यांच्यातच होणार आहे. तर बहुजन वंचित आघाडीचा उमेदवारही निवडणूक रिंगणात आहे.

तब्बल 20 ते 22 दिवस सुरू असलेल्या या प्रचारात भाजपने सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी घेतली होती. भाजपकडून उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही दिवस आधीच गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तर या उलट कॉंग्रेसकडून अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी माजी आमदार मोहन जोशी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे बापट यांना जादा वेळ मिळाला. मात्र, त्यानंतर उमेदवारी जाहीर झालेल्या मोहन जोशी यांनीही जोरदार मुसंडी मारत आणि वेगवान यंत्रणा राबवत शहरात दोन प्रचार फेऱ्या पूर्ण केल्याचे चित्र आहे.

महायुतीकडून सभा, मेळावे, पदयात्रा
बाटप यांच्या प्रचारार्थ भाजपने राष्ट्रीय तसेच राज्यातील बड्या नेत्यांची फौज उतरविली नसल्याचे दिसून आले. बापट यांच्या प्रचारासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी 3, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2, तर प्रकाश जावडेकरांनी एक सभा घेतली घेतली. केंद्रीयमंत्री पियुष गोयल, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, त्यांच्या पत्नी सीमा आठवले, राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन, यांच्या प्रचारफेऱ्या तसेच मेळावे घेण्यात आले. याशिवाय, शिक्षक, महिला, डॉक्‍टर, रिक्षा संघटना, गणेश मंडळे, तसेच वेगवेगळया समाजाचे मेळावेही घेण्यात आले. प्रचारात उतरलेल्या या नेत्यांकडून कॉंग्रेसचा जाहीरनामा तसेच पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी यांच्यावरच टीकेचा रोख ठेवण्यात आला होता. तर महायुतीच्या प्रचारात शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे वगळता इतर कोणताही मोठा नेता दिसून आला नाही. तर भाजपकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढून प्रचाराची सांगता करण्यात आली.

कॉंग्रेसकडून जोरदार प्रचार
कॉंग्रेसच्या प्रचारातही केंद्रीय पातळीवरील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह माजी मंत्री आनंद शर्मा, खासदार कुमार केतकर, भालचंद्र मुणगेकर, मधुसूदन मिस्त्री, सोनल पटेल यांनी पुण्यातील प्रचाराची धुरा सांभाळली. तर राज्यातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, हर्षवर्धन पाटील यांच्यासह शहरातील माजी आमदारांनी कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली. तर कॉंग्रेसकडून दोन्ही पक्षांच्या राज्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थित सभेने प्रचाराची सांगता केली. बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठीही डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेने समारोप करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.