नागपूर – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) सद्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेत आहेत. त्यापूर्वी निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या शिवसेनेला मूळ चिन्ह बहाल केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav thackeray ) यांच्या शिवसेनेला मशाल चिन्ह देण्यात आले. पण, नागपुरातील विधानभवन परिसरात देण्यात आलेल्या पक्ष कार्यालयाच्या फलकावरून मशाल चिन्ह गायब करण्यात आले आहे. ( Hiwali adhiweshan )
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानभवन सज्ज झाले आहे. विधान भवन परिसरात विविध राजकीय पक्षांचे विधिमंडळ पक्ष कार्यालय आहेत. त्या कार्यालयाच्या फलकावर पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) या पक्षाची चिन्हे आहेत. परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यालयाच्या फलकावर मशाल चिन्ह नाही. त्या फलकावर केवळ शिवसेना पक्ष कार्यालय नमूद करण्यात आले.
हिवाळी अधिवेशनाकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. मराठा व धनगर समाजाचे आरक्षणाकडे लक्ष आहे. ओबीसी समाज आपल्या कोट्यातून आरक्षण दिले जाऊ नये म्हणून दक्ष आहे. आरक्षण द्यायचे आहे, कुणाचे कमी करायचे नाही. मग द्यायचे कसे यावर विचारमंथन करताना सरकारचा कस लागणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वातील मराठा समाजाचे आंदोलन, छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वातील ओबीसी आंदोलन यांचा बाहेरून दबाव राहणार आहे. त्यातच विधिमंडळात आमदारांकडून रेटल्या जाणाऱ्या मागणीचे पडसाद उमटतील.
विरोधकांकडे लक्ष
३ राज्यांतील सत्तेने भाजपचा उत्साह वाढलेला आहे. तर काँग्रेस नाउमेद झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घरच्या मैदानावरची खेळी कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुती सरकारची हिवाळी अधिवेशनात आरक्षणाच्या मुद्द्यावर अग्निपरीक्षा होणार आहे.