राज्यातील उष्णतेचा पारा पुन्हा 47 अंशावर

पुणे – मान्सून केरळमध्ये दाखल झाला तरी विदर्भ अद्याप तापलेलाच आहे. गुरूवारी (दि. 30) विदर्भातील ब्रह्मपुरी येथील उष्णतेचा पारा पुन्हा 47 अंशापर्यंत जावून पोहचला. त्यामुळे ब्रह्मपुरीसह नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट होती.
यंदाच्या उन्हाळ्यामध्ये सुरवातीला विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमान तुलनेने कमी होते. तर एप्रिल आणि मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे काही दिवस विदर्भ गारठला होता. मात्र, त्यावेळी मध्य महाराष्ट्र उष्णतेच्या लाटेना अक्षरश: तापला होता. सोलापूर, मालेगाव, जळगावसह पुणे, अहमदनगर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कमाल तापमानाने उच्चांक गाठला होता.
मे महिन्यात पूर्व मौसमी पावसाला सुरवात झाली आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागातील कमाल तापमानात घट झाली. मात्र, विदर्भ झपाट्याने तापू लागला. मागील तीन आठवड्यापासून विदर्भ चांगलाच तापला असून, सलग तिसऱ्यांचा येथील कमाल तापमान 47 अंशावर जावून पोहचले आहे.
दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसात कोकण-गोव्यातील ठाणे, पालघर, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील हवामान उष्ण व दमट राहील. तर विदर्भातील नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याने आॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
राज्यातील काही प्रमुख जिल्ह्यातील कमाल तापमान
ब्रह्मपुरी – 46.9, चंद्रपूर – 45.6, वर्धा – 45, गोंदिया – 44.8, नागपूर – 44.6, अमरावती – 44.2, यवतमाळ – 43.5, अकोला – 42.9, ववाशिम – 42.8, नांदेड – 42.6, जळगाव आणि परभणी – 42.1, मालेगाव – 41.8, बीड – 41.5, अहमदनगर – 41.1, छत्रपती संभाजीनगर – 40.4, धाराशिव आणि सोलापूर – 40


