जगातील सर्वात उंच माणूस; दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा करावा लागतोय सामना

अंकारा: विविध कारणांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या व्यक्तींना लोकप्रियता मिळत असली तरी अनेक वेळा त्यांच्या अडचणी सुद्धा समोर येत असतात. जगातील सर्वात उंच व्यक्ती म्हणून नोंद झालेल्या तरुणालाही हाच अनुभव येत आहे.
जगातील सर्वात उंच व्यक्ती म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या या व्यक्तीचे नाव सुलतान कोसेन असे असून तो 41 वर्षाचा आहे. तुर्कस्तानातील माडीन नावाच्या शहरामध्ये तो राहतो. त्याची उंची आठ फूट तीन इंच म्हणजे तब्बल 251 सेंटीमीटर आहे हा विक्रम मिरवताना दैनंदिन जीवन जगत असताना त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तो कोणत्याही सामान्य बसमधून तो प्रवास करू शकत नाही. विमान प्रवास करत असताना सुद्धा त्याला इकॉनॉमि क्लासचा वापर करता येत नाही. तर लक्झरी क्लासमधूनच त्याला जावे लागते.
रोजच्या वापरातील वस्तू मिळवण्यासाठी सुद्धा अनेक अडचणी येतात सर्वसाधारणपणे वापरण्यासाठी कपडे किंवा चप्पल आणि बूट सुद्धा त्याला विशेष ऑर्डर देऊन तयार करावे लागतात. त्याच्या मापाचे पलंगही उपलब्ध नसल्याने झोपल्यावर त्याची पावले पलंगाच्या बाहेरच येत असतात. ज्याचा त्याला खूप त्रास होतो कारने प्रवास करताना सुद्धा सुलतानला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. तो सहजपणे मोटारीत बसू शकत नाही.
अर्थात दैनंदिन जीवन जगत असताना या अनेक अडचणी त्याच्यासमोर असल्या तरी त्याने त्यावर मात केली आहे आणि जगातील 128 देशांचा दौरा त्याने पूर्ण केला आहे. वैवाहिक जोडीदार निवडताना सुद्धा सुलतानला अनेक अडचणी आल्या त्याच्या उंचीला साजेशी अशी वधू निवडतानाही त्याला अनेक अडचणी आल्या अखेर सर्वसाधारण उंची असलेल्या एका तरुणीशी त्याने लग्न केले आहे.





