नगर तालुक्‍यात भाजप-सेनेत संघर्ष तीव्र

शिवसेनेने आ. कर्डिलेंवरील टीका न थांबविल्यास वेगळा विचार करू – कडूस

नगर: आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ जाहीर मेळाव्यांतून टीका करीत असताना लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे काहीच बोलत नाहीत. त्यामुळे तालुक्‍यात आ. कर्डिले समर्थक आक्रमक झालेले आहेत. या वाचाळवीर शिवसेना नेत्यांना कडक समज द्या, अन्यथा आम्ही वेगळा विचार करू, असा इशारा नगर पंचायत समितीचे गटनेते रवींद्र कडूस यांना दिला आहे.

शिवसेनेच्या जबाबदार नेत्यांकडून आमदार कर्डिले यांच्याबाबत खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. त्यास उत्तर म्हणून नगर तालुका भाजपतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी कडूस बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, रेवणनाथ चोभे, रोहिदास मगर, संभाजी पवार, संतोष म्हस्के, दरेवाडीचे सरपंच अनिल कराळे, राम पानमळकर, रभाजी सूळ, गणेश साठे, मुजाहीद सय्यद, दीपक कार्ले, राहुल पानसरे यांनी शिवसेना नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती आहे.

युतीच्या मेळाव्यात सेनेचे माजी आमदार अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे व कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ हे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्याऐवजी आमचे नेते आ. कर्डिले यांच्यावर युतीचे उमेदवार डॉ. विखे यांच्या उपस्थितीत खालच्या पातळीवर टीका करत आहेत. विरोधी उमेदवार नेमके कर्डिले की जगताप आहेत हाच भेद समजून येत नाही.

बाळासाहेब हराळ हे सुजय विखेंनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आम्हास मदत केल्याने कॉंग्रेस महाआघाडी विखेंसोबत असल्याचे सांगत आहेत. हराळांच्या म्हणण्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या पराभवास सुजय विखे हे जबाबदार आहेत. तरीही आम्ही पक्षाचेच काम करत आहोत. आमच्या नेत्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आम्हाला वेगळा निर्णय घेण्यास भाग पाडू नका, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

नगर तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष राम पानमळकर म्हणाले, भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे हे आमदार कर्डिले यांच्या पुढाकारातून भाजपमध्ये आले. आमदार कर्डिले यांनी विखेंच्या विजयाची जबाबदारी घेतलेली आहे. असे असतानाही शिवसेनेचे नेते आमच्या नेत्यांवर खोटे आरोप करत आहेत. त्यामुळे सेनेच्या नेत्यांस योग्य समज देणे गरजेचे आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गायकवाड, बबन आव्हाड, उद्धव आमृते, संजय जपकर, बन्सी कराळे, श्रीकांत जगदाळे, राहुल पानसरे, सरपंच तुकाराम वाघुले, बाळासाहेब निमसेंसह आदी उपस्थित होते.

बाळू हराळ, हे तर विखेंच्या ताटाखालचे मांजर

या पत्रकारपरिषदेमध्ये प्रसिद्धिपत्रकात बाळासाहेब हराळ यांचा एकेरी उल्लेख करीत ते विखेंच्या ताटाखालचे मांजर असल्याची तिखट प्रतिक्रिया दिलेली असल्याने, नगर तालुक्‍यात भाजप-शिवसेनमध्ये एकमेकांची जिरवाजिरवी सुरू झालेली असल्याने तालुक्‍यात येणाऱ्या काळात नाट्यमय घडामोडी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.