पुणे -कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होणार असून कसब्यात बदल निश्चित होणार आहे. कसब्यातला हाच बदल देशात घडणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने घरोघरी जाऊन प्रचार करा, अशा सूचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना सोमवारी केल्या. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, समविचारी पक्ष, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ संत सावता माळी भवन येथे महाविकास आघाडी कार्यकर्ता-पदाधिकारी मेळावा झाला. याप्रसंगी विधीमंडळ कॉंग्रेस पक्ष नेते बाळासाहेब थोरात, खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार मोहन जोशी, जयदेव गायकवाड, माजी मंत्री रमेश बागवे, माजी उपमहापौर दीपक मानकर, वनराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, रमेश अय्यर, जयंत किराड, गणेश नलावडे, प्रवीण करपे, प्रदीप देशमुख, शानी नौशाद, संगीता पवार, लेखा नायर, शांतिलाल मिसाळ आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, “रवींद्र धंगेकर हे त्यांच्या विकासकामांतून लोकप्रिय आहेत. तिन्ही पक्षांची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. कसब्यातील विजय देशात गुणगाण करणारा असेल.’ थोरात म्हणाले, “महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक अनुकूल आहे. प्रत्येक नागरिक सर्वसामान्यांची निवडणूक असल्याची समजून धंगेकर यांचे काम करत आहेत. त्यामुळे हा विजय सर्वसामान्यांचा असेल. पुणे मनपा निवडणुकीत महापौर महाविकास आघाडीचाच असेल.’ जोशी म्हणाले, “महाविकास आघाडी पहिल्या दिवशीपासून रवींद्र धंगेकर यांचे काम जोमाने करत आहेत. आमच्यात नियोजन, समन्वय चांगले आहे.’ प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, कमलताई ढोले पाटील आदींनी आपली मते मांडली. गणेश नलावडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. अजिंक्य पालकर यांनी आभार मानले. दरम्यान, “ही पोटनिवडणूक म्हणजे उमेदवार निवडून आला किंवा नाही आला, त्यामुळे सरकारवर फरक पडणार नाही. पण, कलुषित झालेल्या सामाजिक व राजकीय वातावरणाला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी रिंगणात उभी ठाकली आहे,’ हा संदेश आपोआप जाईल, असे मत माजी क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले. धंगेकर यांच्या प्रचारार्थ त्यांनी कॉंग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यावेळी उपस्थित होते.