वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायत हद्दीत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत उपलब्ध २ कोटी २५ लक्ष निधीतून सौर ऊर्जेवर चालणारे स्ट्रीट लाईट्चे एकूण ३०० पथदिवे बसविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी दिली. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून व माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून हा निधी उपलब्ध झाला आहे. वडगाव नगरपंचायत हद्दीतील केशवनगर येथील खापरे ओढा ते रेल्वे गेट, कातवी येथील मुख्य रस्ता तसेच खंडोबा मंदिर ते विशाल लाॅन्स या तीनही रस्त्यावर सौर पथदिवे बसविणे व नगरपंचायत प्रशासकीय इमारत सोलर ऑफ ग्रीड सिस्टीम बसविण्यासाठी दिनांक १७ मार्च व २२ मे २०२३ रोजी या कामांचे अंदाजपत्रक तयार करून सर्व विषयांना सभेत मान्यता देण्यात आली होती. मागील महिन्यात तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष निधी मंजूर झाला. त्यानंतर आज रोजी प्रथमतः शहरामधील खापरे ओढा परिसरातून सौर पथदिवे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या जानेवारी अखेरपर्यंत मुख्य रस्त्यांवरील पथदिवे बसविण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे व मुख्याधिकारी प्रविण निकम यांनी दिली. सतत महावितरणकडून वीज दरात वाढ होत असते. त्यामुळे पथदिव्यांच्या वीज वापराचा खर्च वाढतच जात आहे. त्यामुळे येत्या कालावधीत जर सर्वच भागातील पथदिवे सौरऊर्जेवर कार्यान्वित केल्यास वीज बिलात बचत होईल आणि त्याचा नगरपंचायतीला आर्थिक फायदा होईल. अपारंपारिक उर्जेचा वापर करणे गरजेचे राज्यातील विजेची मागणी व पुरवठा यामधील तफावत पाहता अपारंपारिक उर्जेचा वापर करणे योग्य होणार आहे. राज्यातील ग्रामीण भागात सध्याचा विजेचा पुरवठा लक्षात घेता, ग्रामीण भागात पर्यावरण संतुलन प्रणित मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अपारंपारिक स्त्रोतातून निर्मित विजेचा पुरवठा व्हावा या उद्देशाने ग्रामीण भागातील रस्त्यांवर सौर पथ दिवे खांब उभारण्याची योजना सन २०१०-२०११ पासून महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण विभागाने कार्यान्वित केली आहे. ही योजना राज्य शासन, केंद्र शासन, नगरपंचायत व इतर ग्रामपंचायतीच्या सहभागातून राबविण्यात येत आहे. पर्यावरण संरक्षण, सुरक्षितता, कमी किंमत आणि विद्युत शॉकचा धोका नसल्यामुळे सौर पथदिवे अधिक सुरक्षितता सुनिश्चित करतात. भूमिगत स्फोट होण्याचा धोका नाही, कारण भूमिगत पाईप्स खोदण्याची आणि तारा टाकण्याची गरज नाही. सौरऊर्जा शोषून नंतर सौर ऊर्जेचे विजेमध्ये रूपांतर करून आणि नंतर प्रकाशाचा पुरवठा करून सौर ऊर्जा पथदिवे बनवले जातात. सौरऊर्जा कायमस्वरूपी वापरता येते, त्यामुळे विजेच्या वापराबाबत काळजी करण्याची गरज नाही व पर्यावरणाचे प्रदूषणही होणार नाही. – मयूर ढोरे, माजी नगराध्यक्ष, वडगाव नगरपंचायत