The Silent Saviour GOVERNOR : गेल्या काही काळापासून सत्य घटनेवर आधारित चित्रपटांची संख्या वाढलेली दिसत आहे. या चित्रपटांना पाहणारा प्रेक्षकवर्ग देखील मोठा आहे. अशातच आता आणखी एक सत्य घटनेवर आधारित चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘द सायलेंट सेव्हियर गव्हर्नर’ असे या चित्रपटाचे नाव असून, या चित्रपटात बॅालिवूडमधील अनेकांचा आवडता अभिनेता मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी मनोरंजन विश्वातील गुणी अभिनेता चिन्मय मांडलेकरने केले आहे. ‘द केरळ स्टोरी’ आणि ‘द केरळ स्टोरी २ नंतर ‘गोज बियॉन्ड’च्या निर्मात्यांकडून आणखी महत्वाचा विषय या चित्रपटद्वारे दाखवण्यात येणार आहे. आज मनोज बाजपेयी यांचा वाढदिवस असल्याने या दिवसाचे औचित्य साधत निर्मात्यांनी टीझर रिलीज केला आहे. चित्रपटातील कथानक हे सत्य घटनेचा आधार घेऊन तयार करण्यात आले आहे. १९९० च्या दशकात भारताने अनुभवलेल्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाची कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पदद्यावर बघायला मिळणार आहे. (The Silent Saviour GOVERNOR) अभिनेता मनोज बाजपेयी त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखले जातात. या चित्रपटात मनोज हे आरबीए (राष्ट्रीय बँक ऑफ इंडिया) गव्हर्नरच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती सनशाइन पिक्चर्स आणि विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. चिन्मय मांडलेकरने दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. विशेष म्हणजे, चिन्मयने याआधी मनोज वाजपेयींसोबत ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या चित्रपटासाठी काम केले होते. (The Silent Saviour GOVERNOR) ‘गव्हर्नर’ या चित्रपटात मनोज वाजपेयींसह केरळा फाईल्सफेम अभिनेत्री अदा शर्माही लक्षवेधक भूमिकेत दिसणार आहे. आशिम ए. शाह हे या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. सुवेंदु भट्टाचार्जी, सौरभ भारत, रवी असरानी आणि विपुल अमृतलाल शाह यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. याशिवाय दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांनी चित्रपटाची गाणी लिहिली असून अमित त्रिवेदी यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. हा चित्रपट १२ जून २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ( The Silent Saviour GOVERNOR) हेही वाचा : Priyanka Chopra Upcoming Movie: हॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यासोबत झळकणार प्रियंका चोप्रा; ‘रीसेट’ चित्रपटाची अधिकृत घोषणा