संत मुक्ताईच्या नजरेतून ज्ञानेश्वरांची कथा; दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित संत ज्ञानेश्वरांच्या मुक्ताईचा ट्रेलर प्रदर्शित

Sant Dnyaneshwar’s Muktai Movie Trailer | छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपट तयार करणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आता एका वेगळा चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे “संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई”. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा केली जात होती. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट येत्या १८ एप्रिल रोजी महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.
हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या तालावर फुगड्या खेळत दंग झालेले कलाकार, वारकऱ्यांच्या पायांनी धरलेला ठेका, अभंगांच्या स्वरात चिंब झालेले मायबाप प्रेक्षक, आणि कृतज्ञता सन्मान अशा भक्तिमय वातावरणात “संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई” या भव्य आध्यात्मिक चित्रपटाचा नेत्रदीपक ट्रेलर लॉन्च सोहळा आनंदात आणि उत्साहात पार पडला. अल्पावधीतच या ट्रेलरलाही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर ऐतिहासिक चित्रपट तयार करणाऱ्या दिग्पाल लांजेकरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
संत परंपरेचे योगदान अद्वितीय
आजवर वारकरी सांप्रदाय आणि संतांच्या जीवनावर आधारलेले अनेक चित्रपट या आधी रिलीज झालेले आहेत. पण संत ज्ञानेश्वर महाराजांची बहिण मुक्ताई हिच्या दृष्टीकोनातून प्रथमच हा चित्रपट येत आहे. या चित्रपटात अनेक कलाकारांच्या विशेष भूमिका आहेत. ट्रेलरमधून या चित्रपटातील ग्राफिक्सवर प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसते. संत परंपरचे योगदान खूप मोठं आणि अद्वितीय स्वरुपाचे राहिलेले आहे. संताच्या शिकवणीमुळे ज्ञानाचा मार्गा अनेकांना गवसाला. संत संत ज्ञानेश्वर माऊलींनी अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग सर्वसामान्यांना दाखवला. तसेच आध्यात्मिक समतेचा आधार घेऊन त्यांनी वारकरी संप्रदायची सुरुवात केली.
ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या तिन्ही भावंडांना आयुष्यभर समाजाकडून वाईट वागणूक मिळाली. परंतु, खचून न जाता त्यांनी आणि त्यांच्या भावंडांनी भागवत संप्रदायाच्या शिकवणीत आपले स्थान निर्माण केले. याचीच कथा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे दिसणार असून संत मुक्ताईची भूमिका नेहा नाईक हिने साकारली आहे. संत निवृत्तीनाथांच्या भूमिकेत अक्षय केळकर तर संत सोपानकाकांची भूमिका सूरज पारसनीस यांनी केली आहे. यासोबत अनेक कलाकारांच्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिका असणार आहे.





