नागठाणे -काशीळ (ता. सातारा) येथील घरफोडी चोरट्यानी पळविलेल्या ऐवजापैकी दोन लाख 71 हजार रुपये किमतीचा ऐवज बोरगाव पोलिसांनी जप्त केला. न्यायालयाच्या आदेशानुसार हा ऐवज फिर्यादी गुलाममहम्मद मेहबूब भालदार यांना पोलिसांनी परत केला. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, काशीळ येथील गुलाममहम्मद मेहबूब भालदार हे कुटुंबीयांसमवेत गेल्या वर्षी 12 ते 17 जुलै दरम्यान मुंबईला गेले होते. त्या वेळी चोरट्यानी त्यांचे घर फोडून दोन लाख 71 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व चार लाख रुपयांची रोकड, असा सहा लाख 71 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. सेवानिवृत्त झाल्यानंतर उर्वरित आयुष्यासाठी भालदार यांनी साठवलेल्या रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला होता. बोरगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन सपोनि चंद्रकांत माळी व पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांनी या चोरीचा तपास करून संशयितास अटक केली होती. त्यातील नऊ तोळ्यांचे सोन्याचे दागिने सोनारास विकल्याचे संशयिताने तपासात कबूल केले होते. त्यानंतर पोलिसांनी संबंधित सोनाराकडून सोन्याची लगड जप्त केली होती. ही सोन्याची लगड फिर्यादी भालदार यांना परत देण्याचा आदेश सातारच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी नुकताच दिला होता. त्यानुसार सोन्याची लगड भालदार यांना देण्यात आली.