नवी दिल्ली – अमेरिकेने भारताविरोधात लावलेले आयात शुल्क, रुपयाची घसरण, परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री इत्यादी कारणांच्या पार्श्वभूमीवर सरलेल्या 2025 वर्षात शेअर बाजाराच्या मुख्य निर्देशांकात केवळ आठ टक्क्यांनी वाढ झाली. शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य केवळ 30.20 लाख कोटी रुपयांनी वाढले. परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या एकतर्फी विक्रीनंतरही देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यामुळे निर्देशांक आठ टक्क्यांनी वाढू शकले असे समजले जाते. या वर्षात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 6,556 अंकांनी म्हणजे 8.39 टक्क्यांनी वाढला. त्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 30.20 लाख कोटी रुपयांनी वाढून 472 लाख कोटी रुपये म्हणजे 5.25 लाख कोटी डॉलर या पातळीवर गेले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मूल्यांकनानुसार भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 4.1 लाख कोटी रुपये आहे. यावर्षी निर्देशांकाने केवळ 30.20 लाख कोटी रुपयांचा परतावा दिला असला तरी गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये शेअर निर्देशकांनी तब्बल 77.66 लाख कोटी रुपयांचा परतावा दिला होता. तर 2023 मध्ये निर्देशांकांनी त्यापेक्षा जास्त म्हणजे 81.90 लाख कोटी रुपयांचा परतावा दिला होता. सध्याच्या आकडेवारीनुसार बाजार मूल्यात रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वात आघाडीवर असून या कंपनीचे बाजार मूल्य 20.91 लाख कोटी रुपये आहे. एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्य 15.25 लाख कोटी रुपये, एअरटेल कंपनीचे बाजार मूल्य 11.86 लाख कोटी रुपये, टीसीएस कंपनीचे बाजार मूल्य 11.77 लाख कोटी रुपये तर आयसीआयसीआय बँकेचे बाजार मूल्य 9.6 लाख कोटी रुपये आहे. यावर्षी शेअर निर्देशांकाकडून मिळालेल्या कमी परताव्याची मीमांसा करताना विश्लेषकानी सांगितले की, भारतीय कंपन्यांच्या शेअरचे भाव आवश्यकतेपेक्षा जास्त असल्याची भावना गुंतवणूकदारांच्या मनात असतानाच रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतली. त्याचबरोबर पहिल्या आणि दुसर्या तिमाहीत कंपन्यांचे ताळेबंद फारसे नफादायक नव्हते. आता कंपन्यांचे ताळेबंद सुधारत आहेत. दुसर्या तिमाईचा विकास दर 8.2% वर गेला आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात जर काही सकारात्मक घटना घडल्या तर निर्देशांक वाढण्याची शक्यता आहे.