ऍस्ट्रा झेनेकाचा शेअर घसरला

नवी दिल्ली -करोना व्हायरसवरील लस विकसित करणारी कंपनी ऍस्ट्रा झेनेका फार्मा या कंपनीच्या शेअरच्या भावात आज तीन टक्क्यांनी घट झाली. युरोपातील चाचणी वेळी काही अनपेक्षित आजार उद्भवल्यानंतर युरोपात या लसीच्या चाचण्या काही काळ स्थगित करण्यात आल्यामुळे शेअरच्या भावात घट झाल्याचे दिसून आले. सकाळी भारतात या कंपनीचा शेअर 13.40 टक्क्यांनी घसरला होता. यात नंतर सुधारणा झाली.
दरम्यान, बुधवारी शेअरबाजाराच्या मुख्य निर्देशांकांत बरीच घट झाल्याचे दिसून आले. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 171 अंकांनी कमी होऊन 38,193 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबरच राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 39 अंकांनी कमी होऊन 11,278 अंकांवर बंद झाला.
आज झालेल्या विक्रीचा फटका बॅंका, वित्तीय कंपन्या, रिअल्टी क्षेत्रातील कंपन्या माहिती तंत्रज्ञान, ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांना बसला. या क्षेत्रांचे निर्देशांक 2.14 टक्क्यांपर्यंत कमी झाले. तर अशा परिस्थितीतही ऊर्जा, धातू, आरोग्य, दूरसंचार या क्षेत्रांचे निर्देशांक काही प्रमाणात वाढले. याबाबत बोलताना जिओजी वित्तीय सेवा या कंपनीचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, सकाळी आशियाई शेअरबाजारातील निर्देशांक कमी झाल्यानंतर भारतामध्ये विक्री झाली.
रिलायन्स कंपनी तेजीत
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर आज तीन टक्क्यांनी वाढले. या कंपनीतील रिटेल शाखेचे 1.75 टक्के भागभांडवल सिल्व्हर लेक पार्टनर्स ही अमेरिकेतील गुंतवणूक कंपनी विकत घेणार आहे. त्यामुळे रिलायन्स कंपनीच्या शेअरच्या भावात वाढ झाली असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.




