शेअर निर्देशांक उसळुन घसरले; मारुती, ICICI, AXIS, SBI पिछाडीवर

मुंबई – सकाळी शेअर बाजाराचे निर्देशांक बरेच वाढले होते. मात्र बाजार बंद होताना बॅंका आणि वाहन क्षेत्रातील शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यानंतर निर्देशांक कालच्या पातळीपेक्षा कमी झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सकाळी 900 अंकांनी वाढला होता. मात्र बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये कालच्या तुलनेत 76 अंकांची घट होऊन तो 57,200 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ आठ अंकांनी कमी होऊन 17,101 अंकांवर बंद झाला.
मारुती, टेक महिंद्रा, पावर ग्रीड, आयसीआयसीआय बॅंक, ऍक्सिस बॅंक आणि स्टेट बॅंकेचे शेअर तीन टक्क्यांपर्यंत घसरले. अमेरिकेतील व्याजदर वाढीच्या शक्यतेमुळे अगोदरच शेअर बाजार निर्देशांकांत पुरेसे करेक्शन झाले आहे, अशी भावना सकाळी गुंतवणूकदारांच्या मनात होती. त्यामुळे जोरदार खरेदी झाली. मात्र युक्रेनमधील तणावामुळे युरोपीयन शेअर बाजार निर्देशांक कोसळल्यानंतर दुपारच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले.
माहिती तंत्रज्ञान, रिऍल्टी आणि मिड कॅप व स्मॉल कॅपमध्ये बरीच वाढ नोंदली गेली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार मात्र विक्री करीत असून काल या गुंतवणूकदारांनी तब्बल 6 हजार 266 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. आणखी काही काळ विक्री चालू राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अर्थसंकल्प चांगला निघाला तर..
बाजार तज्ञ प्रकाश दिवादन यांना वाटते की, निफ्टीची जेवढी झिज अपेक्षित होती तेवढी झाली आहे. आता निफ्टी वाढत जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पामुळे गुंतवणूकदार थोडे सावध आहेत. अर्थसंकल्पातून सकारात्मक संदेश मिळाले तर निफ्टी एक महिन्यात 18,000 अंकांची पातळी गाठू शकतो. मात्र हे एका दिवसात होणार नाही. म्युच्युअल फंड, इतर संस्थागत गुंतवणूकदार, श्रीमंत भारतीयाकडे भरपूर रोकड आहे. योग्य वेळी ते बाजारात उतरण्याची शक्यता आहे.





